सेलेब्रिटी सूत्रसंचालक हवा ही खरंतर हिंदी टेलीव्हिजनची मोठी गरज. मधला एक काळ असा गेला की प्रत्येक येणाऱ्या नवीन रिअ‍ॅलिटी शोसाठी त्यांना अमिताभ बच्चन, शाहरूख खान, अक्षयकुमार, सलमान खान असे बॉलीवूडचे मोठे कलाकारच हवे होते. शोची सूत्रे असतील तर त्यांच्याच हातात ही मिजास फार काळ सुरू ठेवता आली नाही. कारण या मोठमोठय़ा कलाकारांचा प्रत्येक शो हिट ठरलाच असं नाही. किंबहुना, अमिताभ बच्चन यांनी ‘केबीसी’, सलमान खानने ‘बिग बॉस’ आणि अक्षयने ‘खतरों के खिलाडी’ असे एकेक शोच टिकवून धरले. एरव्ही कुठल्याही पुरस्कार सोहळ्यात सहकलाकारांसह सगळ्यांनाच चिमटे काढत त्यांची विकेट घेणारा शाहरूख खान शोचा सूत्रसंचालक म्हणून चक्क पाचवी ‘ना’पास ठरला. त्यामुळे काही शो वगळता हिंदीतील बहुतेक सर्व रिअ‍ॅलिटी शोची सूत्रे ही सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनीष पॉल, जय भानुशाली, हुसैन कुवाजेरवाला या मंडळींकडेच राहिली आहेत. मराठीतही सूत्रसंचालक म्हणून आपल्या शोसह नावारूपाला आलेले आदेश बांदेकर, डॉ. नीलेश साबळे यांच्यासारखे कलाकार आहेत. मात्र सध्या शोमध्ये वेगळेपणा आणण्यासाठी प्रसिद्ध मराठी कलाकारांना सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आणण्याचा ट्रेंड मराठीत सुरू आहे.

रिअ‍ॅलिटी शोच्या संकल्पनेला परिणामकारकरीत्या प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाण्याची, प्रत्येक भागात ताजेपणा टिकवून ठेवण्याची, स्पर्धक- परीक्षक आणि प्रेक्षक या तिघांमधला दुवा बनून शो हसतमुखाने पार पाडायची जबाबदारी सूत्रसंचालकाकडे असते. मात्र सध्या तेवढे पुरेसे नाही. रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक-परीक्षकांपेक्षाही सूत्रसंचालक हाच त्याचा चेहरा म्हणून ओळखला जातो. त्या सूत्रसंचालकाच्या नावाने कित्येक शो ओळखले जातात. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘झलक दिखला जा’सारख्या शोचे ग्लॅमरस सेलेब्रिटी परीक्षक एकीकडे पण मनीष पॉलचे सूत्रसंचलन हे त्या शोची रंगत वाढवते. तो त्या शोचा खरा चेहरा आहे. मराठीमध्ये सूत्रसंचालनाची धुरा हल्ली अनेक प्रसिद्ध  अभिनेते आणि अभिनेत्री सांभाळताना दिसतायेत. परीक्षकाच्या खुर्चीपर्यंत नेणारा सोपा मार्ग न पकडता सूत्रसंचालकाच्याच भूमिकेत शिरण्याचे महत्त्व या कलाकारांना का वाटतेय? चित्रपट, जाहिरात, टेलिव्हिजन माध्यमातून चांगले काम सुरू असताना, लोकप्रियता मिळत असताना या वाटेवरही चालण्याचा मोह या कलाकारांना का होत असावा? असे अनेक प्रश्न या प्रसिद्ध कलाकारांना सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहताना पडतात.  टेलिव्हिजन हे प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचण्याचे माध्यम झाल्याने अनेक मोठी कलाकार मंडळी त्याकडे वळली. शिवाय रिअ‍ॅलिटी शो सारखे आयते माध्यम मिळाल्यानंतर परीक्षक म्हणून केवळ प्रतिक्रियांपुरते मिरवण्यापेक्षा स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्यासाठी कित्येकांनी सूत्रसंचालनाचे आव्हान स्वीकारले. सुरुवातीच्या काळात सूत्रसंचालकाला मध्यवर्ती ठेवून कार्यक्रमांची निर्मिती होत असे. आणि त्यातून पुढे त्यांना भविष्यातील मार्ग खुले होत असत. ‘सुरभि’  मालिकेमधून प्रथम सूत्रसंचालक म्हणून समोर आलेल्या रेणुका शहाणे हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्यानंतरच त्यांना चित्रपटासाठी विचारणा झाली. मराठीत ‘होम मिनिस्टर’मुळे आदेश बांदेकर खऱ्या अर्थाने भाऊजी म्हणून घराघरात पोहोचले. आता उलट परिस्थिती निर्माण झाली असून शो प्रसिद्ध करण्यासाठी मोठय़ा अथवा प्रसिद्ध कलाकाराला सूत्रसंचालक म्हणून घ्या अशी वाहिन्यांची मानसिकता तयार झाली आहे. त्यातही तो टेलिव्हिजनमधील एखाद्या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेला चेहरा असेल तर उत्तमच. त्यामुळे प्रेक्षकांना खेचून आणण्यासाठी निर्मात्यांना अधिक कष्ट करावे लागत नाहीत. याआधी ‘हफ्ता बंद’ मकरंद अनासपुरे यांनी सूत्रसंचालकाची धुरा सांभाळली होती. ‘कोण होईल मराठी करोडपती’साठी अभिनेता सचिन खेडेकर आणि त्यानंतर स्वप्निल जोशी असे दोन मोठे चेहरे सूत्रसंचालक म्हणून मराठी टेलीव्हिजनने पाहिले. अभिनेता रितेश देशमुखनेही ‘विकता का उत्तर’ हा शो केला. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शो मधून विनोदवीरांचे फटकारे झेलणाऱ्या अमृता खानविलकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्यापाठोपाठ ‘सरगम’मधून ऊर्मिला कोठारे या नायिका आपल्यासमोर आल्या आहेत. याशिवाय ‘एकापेक्षा एक’मधून पुष्कर श्रोत्री, ‘टू मॅड’मधून तरुणांचा लाडका अमेय वाघ तर ‘ढोलकीच्या तालावर’ या सध्या सुरू असलेल्या रिअ‍ॅलिटी शो मधून अभिनेता-दिग्दर्शक, लेखक हेमंत ढोमे आपल्याला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसतो आहे. सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या गायक रोहित राऊतनेही ‘संगीत सम्राट’ या नव्या रिअ‍ॅलिटी शोची जबाबदारी स्वीकारली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मला छोटय़ा पडद्यावर दिसायचं होतं, मात्र त्यामध्ये अडकून पडायचं नव्हतं. त्यासाठी सूत्रसंचालन ही उत्तम संधी वाटल्याने ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’साठी मी होकार दिला. शिवाय बोलण्याची वृत्ती, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा आढावा असणे, उत्तम वाचन असणे असे उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठी लागणारे गुण माझ्यात असल्याने मी ती जबाबदारी स्वीकारली. शिवाय सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असताना तुम्हाला तुमचं काही सादर करण्याची मुभा असते. शिवाय त्यात सजगतेबरोबर सहजताही लागते. मी काम करत असलेल्या शोमध्ये चालू घडामोडींवर सादरीकरण होत असल्याने माझे स्वत:चे त्यासंबंधी वाचन आणि त्याचे संदर्भ माहीत असणे आवश्यक असते.

मृण्मयी देशपांडे

मालिकांमधून काम करत असताना आपण साकारत असलेल्या पात्राच्या नावाने प्रेक्षकांमध्ये ओळखले जातो. हे जरी चांगले असले तरी त्यामुळे आपली स्वत:ची ओळख निर्माण होत नाही. ‘ढोलकीच्या तालावर’ स्वीकारण्यामागचे माझे नेमके कारण हेच होते. मुळात सूत्रसंचालनामुळे मला हेमंत म्हणून स्वत: ला सादर करता येते. याशिवाय तुम्ही लोकांशी थेट संवाद साधता. त्या वेळी कोणतेही संवाद नसतात. शोच्या संकल्पनेला धरूनच बोलणे गरजेचे असते. मी लहान मुलांवर आधारित शोचा भाग असल्याने त्यांना कोणत्या प्रकारे बोलतं करता येईल, त्यामध्ये कशी निरागसता साधता येईल, याचा प्रयत्न करत असतो.  – हेमंत ढोमे

मला सुरुवातीपासूनच सूत्रसंचालन हा प्रकार आवडतो. ते करताना तुम्हाला वेगळ्या पातळीवर सजगता असावी लागते. कारण समोरचा स्पर्धक आणि परीक्षक काय बोलतील याची कल्पना नसते त्यामुळे प्रत्येक क्षणी सतर्क राहावे लागते. तुम्ही सहजपणे शो पुढे नेणं, स्पर्धकांना आधार देणं हे कामही सूत्रसंचालकालाच करावं लागतं. तसंच स्पर्धक आणि परीक्षकांबरोबरच शो प्रसिद्ध करण्यामागेही त्याची मोठी भूमिका असते. कारण सूत्रसंचालक हा शोची संकल्पना प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे नेत असतो. – अमेय वाघ

सूत्रसंचालक जर आपल्या रोजच्या पाहण्यातील असतील तर त्यांचे बोलणे लोकांना पटते. शिवाय तो समन्वय साधण्याचे काम करत असल्याने तो जर प्रसिद्ध चेहरा असेल तर तो आपसूक उत्तम समन्वयक होतो. कारण प्रेक्षक त्यालाच पाहतात. शिवाय काही कलाकारांना सूत्रसंचालकाचं काम छान जमतं. झालेल्या सादरीकरणाला सुरुवातीला योग्य पद्धतीने पुढे नेण्याचे काम सूत्रसंचालकाने केले तरच प्रेक्षक त्याला प्रतिसाद देतात. तसेच माझ्या मते शोचा टीआरपी हा केवळ त्यांच्यामुळे वाढत नसून त्यामध्ये सहभागी असलेले स्पर्धक आणि परीक्षक यांचाही त्याला आधार असतो.  – बवेश जानवलकर, वरिष्ठ कार्यकारी निर्माता, झी युवा

Story img Loader