तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल तर तुम्हाला कॅरी मिनाटी हे नाव नक्कीच परिचयाचं असेल. कॅरी मिनाटी एक लोकप्रिय यूट्यूबर आहे. त्याचे यूट्यूबवर ३० मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स असून त्याला भारतातील सर्वात मोठा यूट्यूबर म्हणून संबोधले जाते. कॅरी हा, रोस्ट व्हिडिओ आणि चर्चित विषयांवर व्हिडिओ तयार करत असतो. त्याने अनेक कलाकारांना रोस्ट केलं आहे. तसंच त्याच्या रिअॅक्शन व्हिडिओ, कॉमेडी स्किटसाठी तो नेहमीच चर्चेत असतो.  मात्र आता हे कॉमेडी स्किटस आणि रोस्ट व्हिडिओ बनवणे कॅरी मिनाटीला महागात पडले आहे. त्याच्या या व्हायरल कंटेंटमुळे तो कायद्याच्या कचाट्यात सापडल्याची माहिती समोर येत आहे.

कॅरी मिनाटीच्या विरोधात दिल्लीतील वकिल गौरव यांनी खटला दाखल केला आहे. कॅरी मिनाटीच्या रोस्ट व्हिडिओमध्ये महिलांवर अपमानास्पद टिपण्या केल्या जातात असा आरोप त्या वकिलाने केला आहे. “महिलांनविरोधात लैंगिक टिप्पणी, स्त्रियांसंदर्भात अश्लील भाषेचा प्रयोग करत असलेले व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट करण्याबद्दल कॅरी मिनाटी विरोधात कलम ३५४, ५०९, २९३ आणि ३/६/७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.” असे ट्वीट या वकिलाने केले आहे.

फरीदाबद मधील यूट्यूबर कॅरी मिनाटीचे खरे नाव अजय नागर आहे. तो वयाच्या दहाव्या वर्षापासूनच युट्यूबवर अॅक्टिव्ह आहे.  लहान असताना त्याला अभ्यासात रस नसल्यानं तो आपला अधिकांश वेळ हा युट्यूबवरच घालवत होता. या आधी सुद्धा तो त्याच्या व्हायरल कंटेंटमुळे चर्चेत होता . त्याचा “YouTube Vs TikTok – The End” हा व्हिडिओ बराच चर्चेत होता. व्हिडीओमध्ये त्यानं टिकटॉक स्टार आमिर सिद्दीकीला रोस्ट केलं होतं. तसंच २०१९ टाइम्स मॅगझीनच्या ‘Next Generation Leader’ च्या यादीत देखील त्याचे नाव सामील आहे.