अश्लील चित्रपट निर्मिती करणारं रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली. प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केलं. राज कुंद्राला अटक केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत असून, अभिनेत्री सागरिका सोना सुमनने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. राज कुंद्राने नग्न होऊन ऑडिशन द्यायला सांगितलं होतं, असा आरोप सागरिकाने केला आहे.
पॉर्न चित्रपट निर्मिती आणि पॉर्न अॅप्स प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आलेली आहे. पॉर्न चित्रपट निर्मिती रॅकेट मुख्य सूत्रधार राज कुंद्रा असल्याचं मुंबई पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे म्हटलेलं आहे. कुंद्राला अटक झाल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली. अटकेचं वृत्त समोर आल्यानंतर अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने कुंद्रावर गंभीर आरोप केला आहे. सागरिकाने एका व्हिडीओतून तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला.
Porn Film Case : आधी कॉल, नंतर ऑडिशनच्या नावाखाली बोल्ड सीन्स…अशी होती राज कुंद्राची मोडस ऑपरेंडी!
“मी सागरिका सोना सुमन. हे अश्लील चित्रपटांचं एक मोठं रॅकेट आहे. यामध्ये मोठे लोक सहभागी आहेत. राज कुंद्रा याचं नाव समोर आलं आहे. लॉकडाउनच्या काळात मलाही एक वाईट अनुभव आला होता. ऑगस्ट २०२० मध्ये मला एका वेब सीरिजमध्ये काम करण्याची ऑफर आली होती. मी होकार दिल्यानंतर राज कुंद्राच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत यांचा मला फोन आला. माझी ऑनलाइन ऑडिशन घेण्याचं ठरलं. मी व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी झाल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली गेली. मला धक्काच बसला आणि मी नकार देत कॉल बंद केला”, असा अनुभव अभिनेत्री सागरिका सोना सुमनने केला आहे.
“त्या व्हिडीओ कॉलमध्ये तीन लोक होते. ज्यात एकाचा चेहरा दिसत नव्हता, पण ती व्यक्ती राज कुंद्रा होती. कारण कुंद्राचा सहाय्यक असलेला कामत सतत या सर्व वेबसाईट राज कुंद्रा चालवतात, असं म्हणत होता. राज कुंद्राने मला न्यूज ऑडिशन द्यायला सांगितलं होतं. राज कुंद्राचं नावही आज समोर आलं आहे. लवकरात लवकर या लोकांना अटक करण्यात यावी, कारण खूप लोकांचं आयुष्य या रॅकेटमुळे खराब होत आहे”, असं सागरिकाने म्हटलं आहे.