‘मसान’, ‘संजू’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ यांसारख्या चित्रपटांमुळे चर्चेत आलेला अभिनेता विकी कौशल सध्या लाखो तरुणींच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळे त्याच्या अभिनयाचीच नव्हे तर वैयक्तिक आयुष्याचीदेखील चर्चा होताना दिसते. काही दिवसांपूर्वीच विकी आणि अभिनेत्री हरलीन सेठी यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. या ब्रेकअपमुळे हरलीनला प्रचंड मानसिक धक्का बसला असून ती नैराश्यात गेली आहे. ही माहिती हरलीनच्या एका जवळच्या व्यक्तीने दिली आहे.
” विकीसोबत ब्रेकअप झाल्यामुळे हरलीनला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. या धक्क्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या धक्क्यातून सावरण्यासाठी हरलीन सध्या तिचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांसोबत घालविण्याचा प्रयत्न करत आहे. या धक्क्यातून ती लवकरात लवकर बाहेर पडावी अशी आशा आम्ही सारेच जण करत आहोत,” असं हरलीनच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं.
दरम्यान, विकी आणि हरलीन यांनी बराच काळ आपलं नातं अधिकृतरित्या जाहीर केलं नव्हतं. मात्र ‘उरी’ चित्रपटाच्या प्रमोशन दोघांनीही एकत्र फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं दिसून येत आहे. हरलीनने विकीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे या चर्चांना सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या ब्रेकअपमागील कारण भूमी पेडणेकर असल्याची चर्चा आहे. याआधी विकी आणि हरलीनचे ब्रेकअप कतरिनामुळे झाल्याचं म्हटलं जात होतं.
विकी कौशल लवकरच राकेश शर्मा बायोपिकमध्ये झळकणार आहे. तसेच करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटातदेखील तो मुख्य भूमिकेत असणार आहे. करिना कपूर, रणवीर सिंग, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर आणि भूमी पेडणेकर देखील या चित्रपटात दिसणार आहेत.