आपल्या विविधरंगी भूमिकांनी रंगभूमी ते रुपेरी पडदा व्यापून टाकणारे चतुरस्र व ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आता पुन्हा एका नव्या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहेत. एका मराठी चित्रपटासाठी त्यांनी चक्क गाण्याच्या ठेक्यावर ताल धरल्याचे आपल्याला दिसणार आहे.
बॉलिवुडमधील मराठी तारा श्रेयस तळपदे सध्या त्याच्या होम प्रॉडक्शन असलेल्या ‘पोश्टर बॉइज’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनल गाण्यातून दिलीप प्रभावळकर नाचताना दिसणार आहेत. याआधीच चित्रपटाच्या पहिल्या लूकमध्ये ‘सिक्स पॅक अ‍ॅब्स’मधल्या दिलीप प्रभावळकरांनी सर्वाना थक्क केलंच होतं, पण आता ते चक्क नाचतानाही दिसणार आहेत. यासंबंधी ‘लोकसत्ता’शी बोलताना प्रभावळकर म्हणाले, ‘याआधी हिंदीमध्ये ‘एन्काऊंटर’चित्रपटासाठी माझ्यावर संपूर्ण गाणं चित्रित झालं होतं. पण ती खूप जुनी गोष्ट आहे. पण या वयात चित्रपटासाठी नाचायचं म्हटलं तेव्हा मी खरतर थोडं घाबरलोच होतो, पण माझ्या कोरिओग्राफरने मला खूप समजून घेतले.’  अर्थात या गाण्याच्या चित्रिकरणाच्या एक दिवस आधीच दिलीप प्रभावळकरांच्या पायाला दुखापत झाली होती, पण त्याही परिस्थितीत त्यांनी त्यांचे नृत्य पूर्ण केले. यासंबंधी चित्रपटाचा निर्माता श्रेयस तळपदेने सांगितले की, ‘दिलीप सरांना नाचायला सांगताना आम्हीच थोडे घाबरलो होतो, त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. पण त्यांनी ही कल्पना खूप आवडली होती. त्यामुळे त्यांनी उत्साहाने या गाण्यात नाचायचे ठरवले.’ लवकरचं ‘पोश्टर बॉइज’ हे गाणं आपल्या भेटीस येणार आहे.

Story img Loader