भारतातील आजच्या घाडीचे सुपरस्टार्स म्हटले की त्यात एक नाव हमखास सामील असतं ते म्हणजे प्रभास. दक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत आज त्याने जगभरात त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज या सुपरस्टारचा वाढदिवस. त्यानिमित्त त्याच्या करिअरचा घेतलेला आढावा…
प्रभासचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ साली झाला. प्रभासचं संपूर्ण नाव सूर्यनारायण वैंकट प्रभास राजु उप्पलपाटि असं आहे. उप्पलपति सूर्या नारायण राजू हे त्याच्या वडिलांचं नाव, तर आईचं नाव सिवा कुमारी आहे. उप्पलपति सूर्या नारायण राजू त्यांना तीन मुलं आणि प्रभास त्यातील सर्वात धाकटा मुलगा. प्रभासचे वडील चित्रपट निर्माता असल्याने त्याला घरातूनच चित्रपट क्षेत्रातील बाळकडू मिळत गेलं. याबरोबरच प्रभासचे काका कृष्णम राजू हेही लोकप्रिय तेलुगू अभिनेते. पण प्रभासचा सिनेसृष्टीतील प्रवास अजिबात सोपा नव्हता.
प्रभासने त्याचं शालेय शिक्षण चेन्नईतील डॉन बॉस्को मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल आणि डीएनआर हाय स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर त्याने काही वर्ष हैदराबादमधील नालंदा कॉलेजमधूनही शिक्षण घेतलं. हैदराबादमधीलच श्री चैतन्य कॉलेजमधून त्याने इंजीनियरिंगची डिग्री घेतली. तो इंजिनियर जरी झाला असला तरीही त्याला खुणावत होतं ते मनोरंजन क्षेत्र. त्यामुळे अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या आधी प्रभासने अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. त्यासाठी तो विशाखापट्टणमला गेला आणि तेथील सत्यानंद फिल्म इन्स्टिट्यूटमधून त्याने अभिनयाचे धडे गिरवले. मनोरंजन सृष्टीत येण्याच्या आधी त्याने या क्षेत्रातील सर्व ज्ञान मिळवलं आणि मगच या क्षेत्रात पाऊल टाकलं.
२००२ साली त्याने ‘ईश्वर’ या तेलुगू चित्रपटातून त्याच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीचा शुभारंभ केला. परंतु या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपयश आलं. त्यानंतर लगेचच २००३ साली प्रभासचा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं नाव होतं ‘रघुवेंद्र.’ परंतु हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात अपयशी ठरला. त्याचे सलग दोन चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्याच्या करिअरमधील ब्रेक थ्रू पॉइंट ठरला तो त्याचा पुढील चित्रपट ‘वर्षम.’ २००४ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील कामामुळे प्रभासला दक्षिणात्य सिनेसृष्टीत वेगळी ओळख मिळवून दिली.
‘वर्षम’ प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटानंतर प्रभास च्या करिअरला एक दिशा प्राप्त झाली. यानंतर त्याने ‘चक्रम’, ‘छत्रपती’, ‘योगी’, ‘मुन्ना’, ‘बिल्ला’, ‘एक निरंजन’, ‘मिस्टर परफेक्ट’, ‘रिबेल’, अशा अनेक चित्रपटांमधून त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. पण त्यानंतर प्रदर्शित झालेला एस एस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ चित्रपट प्रभासच्या करिअरमधील मायलो स्टोन ठरला. या चित्रपटात त्याने ‘बाहुबली’ हे प्रमुख भूमिका साकारली होती. ‘बाहुबली’चा पहिला भाग २०१५ साली प्रदर्शित झाला, जाने प्रभासला जगभरात ओळख मिळवून दिली. हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत प्रभास सुपरस्टार झाला. या चित्रपटाने जगभरातून तुफान पैसा कमावला. तर त्यानंतर २०१७ मध्ये याच चित्रपटाचा पुढील भाग ‘बाहुबली: द कन्क्लूजन’ प्रदर्शित झाला आणि त्याला देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या दोन चित्रपटांमुळे प्रभास अभिनेता म्हणून जगभरात कौतुक होऊ लागलं.
‘बाहुबली’नंतर प्रभास भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला. ‘बाहुबली २’ या चित्रपटासाठी प्रभासने २५ कोटी मानधन घेतलं होतं. पण ‘बाहुबली’चे दोन्ही भाग सुपरहिट झाल्यानंतर प्रभासचा भाव चांगलाच वाढला. ‘बाहुबली’नंतर साईन केलेल्या चित्रपटांसाठी प्रभासने १०० हून अधिक कोटींचं मानधन घेतलं आहे. अनेक जाहिरातींमधूनही तो कोट्यवधी कमवू लागला. तो आकारत असलेल्या मानधनामुळे त्याचं नाव फोर्ब्सच्या हाय पेड भारतीय अभिनेत्यांच्या यादीतही झालं.
पण ‘बाहुबली २’ नंतर त्याच्या करिअरला काहीशी उतरती कळा लागलेली दिसली. त्याचा ‘साहो’, ‘राधेश्याम’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करण्यात अपयशी ठरले. तर गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभासने प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपटात दाखवल्या गेलेल्या दृश्यांवर जोरदार टीका झाली आणि हा चित्रपट सपशेल फ्लॉप ठरला.
करिअरमध्ये आतापर्यंत कितीही चढ-उतार आले तरीही प्रभासने कधीही आतापर्यंत हार मानलेली नाही. आगामी काळात प्रभास ‘सलार’ आणि ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत दिसेल. अशा या मेहनती आणि जिद्दी अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!