ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही यातील संवाद आणि दृश्यावरुन चित्रपटावर जोरदार टीका झाली. चित्रपटातील संवाद बदलल्यावरही त्याचा काहीही परिणाम झाला नाही, लोकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. प्रभासचे बरेच चाहतेही यामुळे चांगलेच नाराज झाले, पण त्यानंतर लगेचच प्रभासच्या ‘सलार’बद्दल मोठी बातमी समोर आली. सप्टेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार अशी चर्चा रंगू लागली.
आता पुन्हा एकदा ‘सलार’ची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असल्याने निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे, पण ‘सलार’च्या निर्मात्यांनी पोस्ट प्रोडक्शनच कारण देत याबद्दल एक स्वतंत्र पोस्ट करत चाहत्यांची माफी मागितली आहे.
आणखी वाचा : पूजा हेगडेचा ग्लॅमरस लूक अन् ज्वेलरीची चर्चा; अभिनेत्रीला मिळाला ‘हा’ खास पुरस्कार
‘आदिपुरुष’नंतर प्रभासचे चाहते त्याच्या आगामी ‘सलार’मधून दमदार कमबॅकची अपेक्षा करत आहेत, पण काही कारणास्तव हा चित्रपट लांबणीवर पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘Homble Films’ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे, त्यात त्यांनी लिहिलं, “आम्ही तुमच्या समर्थनाची खूप प्रशंसा करतो. मात्र काही कारणास्तव चित्रपटाची २८ सप्टेंबर ही रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे कारण आम्हाला तुमच्यासमोर चित्रपटाचा एक उत्तम अनुभव सादर करायचा आहे. आमची टीम तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहोत. चित्रपटाची नवीन रिलीज डेट लवकरच जाहीर करण्यात येईल.”
नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला अन् त्याल प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला. ‘सलार’मध्ये प्रभासबरोबर श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका आहे. याबरोबरच प्रभासच्या आगामी ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपटही चांगलाच चर्चेत आहे.