अभिनेता प्रभास हा सध्या त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटात तो श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री क्रिती सेनॉन या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाबरोबरच प्रभास त्याच्या वैयक्तिक आयुष्यमुळे चांगलाच चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो आणि क्रिती सेनॉन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर त्यांनी कधीही कोणतंही भाष्य केलेलं नाही. परंतु आता तो लग्न कधी करणार आहे याचं त्याने उत्तर दिलं आहे.
‘आदिपुरुष’चा फायनल ट्रेलर काल प्रदर्शित झाला. या ट्रेलर लॉन्चसाठी तिरुपतीमध्ये एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला या चित्रपटाची टीमही उपस्थित होती. यावेळी त्यांनी त्यांच्या चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधला.
या कार्यक्रमात प्रभास अगदी आनंदी मूडमध्ये होता. या कार्यक्रमात चाहत्यांनी त्याला भरपूर प्रश्न विचारले. यावेळी एका चाहत्याने त्याला “तू लग्न कधी करणार?” असा प्रश्न विचारला. यावर प्रभासनेही मजेशीर उत्तर दिलं. तो म्हणाला, “मी लग्न कधी करणार हे माहीत नाही. पण मी लग्न नक्कीच तिरूपतीला करणार.” प्रभासने दिलेलं हे उत्तर त्याच्या चाहत्यांना फार आवडलं. त्यामुळे आता प्रभास कधी लग्न करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.