बॉक्स ऑफिसवर दोन मोठे चित्रपट आमने-सामने आले तर त्यापैकी एका चित्रपटाला नक्कीच फटका बसतो. ही गोष्ट आपण बऱ्याचदा अनुभवली आहे. नुक्ताचा रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ आणि विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले अन् विकी कौशलच्या चित्रपटाला फटका बसला अन् रणबीरच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत ८०० कोटींहून अधिक कमाई केली.
यानंतर लगेच याच महिन्यात शाहरुख खानचा बहुचर्चित ‘डंकी’ आणि प्रभासचा ‘सालार’ हे दोन्ही चित्रपट पाठोपाठ प्रदर्शित झाले. प्रदर्शनाच्या आधीच दोन्ही सुपेरस्टार्सच्या चाहत्यांमध्ये चांगलीच स्पर्धा पाहायला मिळत होती. अगदी स्क्रीन्स मिळण्यापासून हे वाद सुरू झाले ते अद्याप थांबलेले नाहीत. ‘डंकी’ २१ डिसेंबर २०२३ रोजी तर ‘सालार’ २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी ‘डंकी’ची कमाई चांगली होती, परंतु ‘सालार’ प्रदर्शित झाल्यानंतर ‘डंकी’च्या कलेक्शनला उतरती कळा लागली.
आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर मेगाफ्लॉप ठरलेला कंगना रणौतचा ‘तेजस’ आता OTT वर; वाचा कधी अन् कुठे पाहता येणार?
‘डंकी’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी तर ‘सालार’ने पहिल्याच दिवसांत सगळे रेकॉर्ड मोडीत काढत १०० कोटींचा टप्पा पार केला. आता असं सांगितलं जात आहे ‘सालार’चे निर्माते होमबाले फिल्म्सनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाच्या कलेक्शनच्या अधिकृत पोस्ट डिलिट केल्या आहे. ‘डंकी’च्या कमी कमाईचा फायदा घेत आकडे वाढवून दाखवल्याचा आरोप ‘सालार’च्या निर्मात्यांवर शाहरुखचे चाहते करत आहेत.
यामुळेच सध्या सोशल मीडियावर शाहरुख विरुद्ध प्रभास अशी टक्कर पाहायला मिळत आहे. ‘सालार’च्या कमाईचे सगळे आकडे हे खोटे असल्याचा दावाही बऱ्याच लोकांनी केला आहे. अद्याप ‘सालार’च्या निर्मात्यांनी याबद्दल काही भाष्य केलं नसलं तरी प्रभासचे चाहते त्याच्या बाजूने उभे राहिले आहेत. बऱ्याच चाहत्यांनी हा आरोप खोटा असल्याचं सांगितलं आहे. ‘सालार’च्या कमाईचे आकडे त्यांच्या निर्मात्यांनी नव्हे तर ‘सालार सागा’ या अधिकृत पेजने शेअर केले होते ही गोष्ट सोशल मीडियावर त्यांनी पुराव्यासह सिद्ध केली आहे. त्यामुळे ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं स्पष्ट होत आहे.
प्रभासचा ‘सालार’ चित्रपटाच्या शाहरुखच्या ‘डंकी’वर परिणाम होताना दिसत आहे. एकीकडे ‘डंकी’च्या कमाईत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे तर दुसरीकडे प्रभासच्या सालारच्या कमाईत वाढ होत आहे. तीन दिवसात ‘सालार’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ‘सालार’ने ९० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ५६.७ कोटींचा व्यवसाय केला होता. तर तिसऱ्या दिवशी ‘सालार’ने ‘डंकी’पेक्षा दुप्पट म्हणजे ६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या तीन दिवसांमध्ये ‘सालार’ने भारतात २०८ कोटींचा व्यवसाय केला आहे तर जगभरात या चित्रपटाने ४०० कोटींचा आकडा पार केला आहे.