ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडला. या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोल करण्यात आलेलं. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही यातील संवाद आणि दृश्यावरुन चित्रपटावर जोरदार टीका करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी तर चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट दाखवल्यावरुन तोडफोड करण्यात आली आहे. प्रभू श्रीराम असो किंवा रावण कोणाचंही काम प्रेक्षकांना पसंत पडलेलं नाही.
चित्रपटातील संवाद बदलल्यावरही त्याचा काहीही परिणाम झालेला नाही, लोकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. प्रभासचे बरेच चाहतेही नाराज झाले आहेत, पण त्यांनी निराश होण्याचं कारण नाही. कारण प्रभासचा आगामी चित्रपट ‘सलार’बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रीपोर्टनुसार ‘आदिपुरुष’ जरी दणकून आपटला असला तरी प्रभासच्या आगामी ‘सलार’च्या बाबतीत असं होण्याची शक्यता नाही.
आणखी वाचा : बॉलिवूडची ‘खल्लास गर्ल’ ईशा कोपिकर होणार दुसऱ्यांदा आई? व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज
ट्रेड एक्स्पर्टच्या अंदाजानुसार प्रभासचा ‘सलार’ या पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग करेल असं स्पष्ट झालं आहे. ‘आदिपुरुष’च्या बाबतीत एवढी नकारात्मकता असूनही त्याने पहिल्याच दिवशी १४० कोटींचा गल्ला जमवला. हे पाहता अन् प्रभासची स्टार पॉवर पाहता त्याचा आगामी चित्रपट ‘सलार’ हा पहिल्याच दिवशी २०० कोटींचा टप्पा पार करेल अशी शक्यता बऱ्याच ट्रेड एक्स्पर्टकडून सांगितलं जात आहे.
पहिल्या तीन दिवसांनी ‘आदिपुरुष’ची बॉक्स ऑफिसवरील कमाई निराशाजनकच होती. ही गोष्ट मात्र ‘सलार’च्या बाबतीत घडणार नाही. ‘सलार’चं दिग्दर्शन केजीएफ फेम प्रशांत नील करत आहेत. अद्याप या चित्रपटाबद्दल काहीही समोर आलेलं नसताना याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ‘सलार’ला नॉर्थ अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करायचा दिग्दर्शकाचा मनसुबा आहे.
‘सलार’चं चित्रीकरण पूर्ण झालं आहे, २८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात प्रभाससह श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबूसारखे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.