दाक्षिणात्य अभिनेता प्रभास लवकरच ‘राधे श्याम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे ते एका वेगळ्याच कारणाने. प्रभासचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्याच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरताना दिसतात. आताही त्याची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्यानं एका मराठमोळ्या अभिनेत्याचं कौतुक केलं आहे.
प्रभासनं त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे आणि यासोबतच या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले अभिनेता प्रवीण तरडे यांच्यासाठी एक खास पोस्टही लिहिली आहे. प्रभासच्या या पोस्टमुळे त्यानं महाराष्ट्रातील चाहत्यांचं मन जिंकलं आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
‘सरसेनापती हंबीरराव’चा टीझर फेसबुकवर शेअर करताना प्रभासनं लिहिलं, ‘मला टीजर खूप आवडला! मराठीतील आत्तापर्यंतच्या सर्वात भव्य अशा ऐतिहासिक चित्रपटाला माझ्या खूप शुभेच्छा. #SarsenapatiHambirrao प्रवीण विठ्ठल तरडे’
मराठी अभिनेता प्रवीण तरडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाची निर्मिती शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम आणि धर्मेंद्र बोरा यांनी केली आहे. प्रविण तरडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.