प्रभात फिल्म कंपनीने रुपेरी पडद्यावर अजरामर चित्रपट आणले. ‘प्रभात’चे अविस्मरणीय चित्रपट, त्यातील विषय, अभिनय तसेच अन्य सर्वच बाबतीत आजही चित्रपटरसिकांच्या मनावर कोरले गेले आहेत. अलीकडच्या काळात प्रभात एण्टरप्रायझेस या नावाने विवेक दामले यांनी चित्रपट वितरक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’फेम दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांच्या ‘सुराज्य’ या १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे वितरण प्रभात एण्टरप्रायझेसतर्फे केले जाणार आहे. विशेष म्हणजे सामाजिक-राजकीय विषयाची गंभीरपणे मांडणी असणाऱ्या ‘सुराज्य’च्या वितरणामध्ये प्रथमच प्रभात फिल्म कंपनीचा मूळ लोगो वापरण्याचा निर्णय विवेक दामले यांनी घेतला आहे.
‘मुंबई वृत्तान्त’शी बोलताना दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी ‘सुराज्य’ चित्रपटासोबत प्रभात फिल्म कंपनीचा मूळ लोगो जोडला जाणे ही आमच्या टीमसाठी निश्चितपणे अभिमानास्पद बाब आहे. सुप्रशासन, लोकांचे भले करणारे प्रशासन असावे ही माफक अपेक्षाही आजच्या काळात राज्यकर्ते पूर्ण करू शकत नाहीत. मूलभूत गरजाही पूर्ण करू न शकणारी व्यवस्था आज समाजात दिसते. एकीकडे राजकीय व्यवस्था आणि दुसरीकडे प्रचंड पैसा असलेली देवस्थाने आपण सगळेच पाहतो आहोत. पैशाच्या कमतरतेमुळे अनेक योजना गरजू, गरीब लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यातच भ्रष्टाचाराने बरबटलेली व्यवस्था आहे. अशा सगळ्या परिस्थितीत सुराज्य म्हणजेच चांगले प्रशासन, योजना अमलात आणून गरजू लोकांना थेट त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या एका तरुणाची गोष्ट रुपेरी पडद्यावर मनोरंजकपणे परंतु विशिष्ट संदेश देणारा चित्रपट बनविण्याचा प्रयत्न आपण केला आहे, अशी माहिती संतोष मांजरेकर यांनी ‘मुंबई वृत्तान्त’ला दिली. विनायक प्रभू यांची मूळ कथा असलेल्या ‘सुराज्य’ चित्रपटात वैभव तत्त्ववादी आणि मृणाल ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुरस्कारविजेते छायालेखक विक्रम अमलाडी या चित्रपटाचे छायालेखक असून, सौरभ भावे यांनी पटकथा-संवाद लेखन केले आहे.
मी लिहिलेली कथा निव्वळ बेतलेली किंवा रचलेली नाही. काही अनुभव मिळाले. त्या सत्य घटनांचा साक्षीदार म्हणून अनुभव घेतल्यानंतर अस्वस्थ झालो. त्यातूनच कथा लिहावी असे तीव्रतेने वाटले म्हणून प्रथमच कथा लिहिली आणि चित्रपटाची टीम गोळा करताना, निर्माते उमेश राव आणि दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांच्याशी चर्चा करतानाच कार्यकारी निर्माता म्हणून चित्रपटाशी जोडला गेलो. माझ्या मूळ कथेला सौरभ भावे यांनी अनुरूप पटकथा तयार केली आहे. हा चित्रपट आमच्या संपूर्ण टीमने एक ध्येय म्हणून तयार केला आहे. केवळ चांगली कथा म्हणून ती पडद्यावर यावी असे कधीच मनात नव्हते. तर लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय, त्यातून निश्चित असा संदेश द्यावा हा हेतू असला, तरी दिग्दर्शकाने हाच संदेश अतिशय मनोरंजक पद्धतीने ‘सुराज्य’द्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे.
-विनायक प्रभू , कथा लेखक व कार्यकारी निर्माता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा