मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. याच नाटकाच्या प्रयोगांच्या वेळचा एक धम्माल किस्सा प्रदीप पटवर्धन यांचे मित्र विजय पाटकर यांनी कलर्स मराठीच्या एका कार्यक्रमात सांगितला होता.
मकरंद अनासपुरे यांचा ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ हा कलर्स मराठीवरील चॅट शो प्रचंड गाजला होता. या शोमध्ये मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या एका एपिसोडमध्ये विजय पाटकर यांनी प्रदीप पटवर्धन यांचा एक मजेशीर किस्सा शेअर केला होता.
आणखी वाचा- Pradeep Patwardhan Passes Away : ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन
विजय पाटकर या कार्यक्रमात ‘मोरूची मावशी’ या नाटकाच्या आठवणींना उजाळा देत म्हणाले होते, “प्रदीपची आणखी एक क्वालिटी म्हणजे तो बिझिनेस माइंडेड आहे.. त्या काळात मोरूची मावशी हाऊसफुल्ल चालत होतं. सुधीर भटांकडून जी काही मिळतील ती पाच तिकिट दहा तिकिटं तो घ्यायचा आणि ती ब्लॅक करायचा.. नाटकाची कमाई आणि हे वरचे पैसे… कुठल्या नटाला हे सुचेल सांगा. कुठला नट तिकिटं घेईल आणि ब्लॅक करेल”
विजय पाटकर यांनी केलेला हा खुलासा ऐकल्यानंतर यावर स्पष्टीकरण देत प्रदीप पटवर्धन म्हणाले होते, “अरे मी कशाला तिकिटं ब्लॅक करेन, चांगली नोकरी करत होतो मी, मला तिकिटं ब्लॅक करायची काय गरज? माझ्या एंट्रीनं ‘मोरूची मावशी’ नाटक सुरू होतं, तर मी तिथं एंट्री घेऊ का खाली जाऊन तिकिटं ब्लॅकमध्ये विकत बसू.” त्यांच्या या स्पष्टीकरणावर सर्वांनीच हसून दाद दिली होती. विजय पाटकर आणि प्रदीप पटवर्धन यांची मैत्रीही सिनेसृष्टीत बरीच गाजलेली होती.
दरम्यान मराठीत लोकप्रिय ठरलेल्या मोजक्या विनोदी अभिनेत्यांमध्ये प्रदीप पटवर्धन यांचे नाव आवर्जून घेतले जाते. गिरगावात राहणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना एकांकिका स्पर्धांमध्ये काम केले होते. चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख असलेले प्रदीप पटवर्धन त्यानंतर व्यावसायिक नाटकांकडे वळले. १९८५ साली आलेल्या सुयोग निर्मित ‘मोरूची मावशी’ या नाटकात अभिनेता प्रशांत दामले यांच्याबरोबर त्यांनी भूमिका केली होती. या नाटकातील भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली.