मला सार्वजनिक गणशोत्सव जास्त आवडतो. माझ्या घरी दहा दिवस गणपती असतो. पण, मला नेहमीच सार्वजनिक मंडळांचं अप्रूप वाटत आलं आहे. लोकमान्य टिळकांनी जो उद्देश ठेवून गणेशोत्सव सुरू केला होता तो उद्देश सगळी सार्वजनिक मंडळं जपतात. म्हणून मला सार्वजनिक मंडळांचे गणपती आवडतात. अशा मंडळांमध्ये गणेशोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम होत असतात. आणि अशा कार्यक्रमांमधून अनेकांना चांगलं व्यासपीठ मिळतं. मी स्वत: अशा कार्यक्रमांमधून परफॉर्म केलंय. तिथून माझा आत्मविश्वास वाढत गेला. या उत्सवाच्या निमित्ताने लोकांनी एकत्र यावं, भेटावं, एकमेकांशी बोलावं, नाती जपावी, विचारांची देवाणघेवाण व्हावी हाच सार्वजनिक गणेशोत्सवाचा हेतू असतो. या उत्सवामुळे मंडळांमधली एकी बघून आनंद होतो. आमच्या घरच्या गणपतीची बरीचशी तयारी आई करते. उत्सवाच्या सुरुवातीच्या आधीच्या दिवसांमधली लगबग, सजावटीची तयारी, जागून केलेली आरास, मित्रमंडळींसोबत केलेला दंगा हे सगळं मी खूप एन्जॉय करते. गणपतीच्या आधी घराला रंग काढू या किंवा वेगळा रंग देऊ या, मूर्ती कोणती आणायची वगैरे सगळ्यावर चर्चासत्रच होत असतं. बाप्पाची प्रतिष्ठापना ते विसर्जन असे सगळे दिवस मी एन्जॉय करायचे. पण, आता शूटमुळे इतका वेळ देणं जमत नाही. मी मुंबईत आणि घर पुण्यात असल्यामुळे सगळे दिवस तिथे राहणं शक्य होत नाही. पण, जेव्हा जाते तेव्हा या सणाचा मनसोक्त आनंद घेते. आरती, मंत्रपठण, भजन या सगळ्यामुळे वातावरण खूप प्रसन्न होऊन जातं आणि घराला वेगळंच रूप प्राप्त होतं. बाप्पासाठी वेगवेगळे नैवेद्य केले जातात. त्याच्याबरोबर आमचीही खाण्याची चंगळ असते. मला मात्र डाएटमुळे स्वत:वर फारच कंट्रोल ठेवावा लागतो. पण मोदकांशी नो कॉम्प्रमाइज..
प्राजक्ता माळी
गणपती विशेषः सार्वजनिक गणेशोत्सव आवडीचे
मला सार्वजनिक गणशोत्सव जास्त आवडतो. माझ्या घरी दहा दिवस गणपती असतो.
First published on: 05-09-2014 at 07:56 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajakta mali likes ganeshotsav