मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सध्या प्राजक्ताकडे बरेच प्रोजेक्ट असून सातत्यानं ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याचे अपडेट देत असते. अलिकडेच प्रदिर्शित झालेली ‘रानबाजार’ ही तिची वेब सीरिज बरीच गाजली होती. त्यानंतर आता लवकरच ती ‘वाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्राजक्तासोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा असतानाच प्राजक्तानं मुक्तासोबत काम करण्याचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
प्राजक्ता माळीनं अभिनेत्री मुक्ता बर्वेसाठी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत तिने मुक्तासोबतचा एक सुंदर फोटो देखील शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये प्राजक्ता माळीनं लिहिलं, “मुक्ता ताई, तुझ्याबरोबर काम करण्याची; त्यानिमित्ताने तुझ्याबरोबर वेळ घालवण्याची संधी ‘वाय’ चित्रपटामुळे मिळाली. हे माझ्यासाठी खूपच खास आहे. जेव्हा तुम्ही तुमचा आदर्श असलेल्या व्यक्तीसोबत काम करत असता तेव्हा त्यापेक्षा उत्तम काही असूच शकत नाही.”
आणखी वाचा- राणादा- पाठकबाईंची लगीनघाई, ‘या’ ठिकाणी अक्षया- हार्दिक घेणार सप्तपदी!
दरम्यान ‘वाय’ चित्रपटात मुक्ता बर्वे आणि प्राजक्ता माळी यांच्यासोबतच नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा नामवंत कलाकारांसोबत रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मराठीतील हा एक मल्टी-स्टारर चित्रपट असल्याचे दिसून येत आहे. मन हेलावून टाकणारा असा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अजित वाडीकर यांनी केलं आहे.
आणखी वाचा- इब्राहिम अली खान नाही तर ‘हा’ अभिनेता आहे श्वेता तिवारीच्या लेकीचा बॉयफ्रेंड!
मुक्ता बर्वे या चित्रपटात एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत. या घटना दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी का घडत आहेत? या घटनांमागे काही दृश्य आणि अदृश्य हात आहेत; ज्यातील काही मदतीसाठी आहेत तर काही घात करणारेही आहेत. या सर्व गोष्टींचा शोध घेताना मुक्ता दिसत आहे. यात तिला यश मिळणार की तिचा हा शोध अपूर्णच राहणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘वाय’ पाहिल्यावर मिळणार आहेत.