ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ती ट्विटरवरून आपली मतं मांडत असतात. ते अनेक सामाजिक व राजकीय घटनांवर ट्विटरवरून प्रतिक्रिया देत असतात. प्रकाश राज यांनी नुकतंच एक ट्वीट केलं होतं, ज्याद्वारे त्यांनी चांद्रयान मोहिमेची खिल्ली उडवली होती. या ट्वीटनंतर ते प्रचंड ट्रोल झाले. त्या ट्रोलिंगनंतर त्यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे.
प्रकाश राज यांनी उडवली चांद्रयान मोहिमेची खिल्ली, नेटकऱ्यांचा संताप
प्रकाश राज यांचं ट्वीट काय होतं?
प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचं व्यंगचित्र शेअर केलं होतं. ज्यामध्ये के सिवन हे चहा ओतताना दिसतात. ‘चंद्रावरून विक्रम लँडरने पाठवलेला पहिला फोटो, वॉव’ असं म्हणत त्यांनी हे व्यंगचित्र शेअर केलं आणि चांद्रयान-३ ची खिल्ली उडवली. त्यानंतर नेटकरी संतापले आणि त्यांना ट्रोल केलं. त्यावर प्रकाश राज यांनी दुसरं ट्वीट केलंय.
नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर प्रकाश राज काय म्हणाले?
“द्वेष करणाऱ्यांना फक्त द्वेष दिसतो. मी आर्मस्ट्राँग टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या विनोदाचा संदर्भ देत होतो, जे आमच्या केरळच्या चहा विक्रेत्याचा आनंद साजरा करत होते. ट्रोल्सनी कोणत्या चहा विक्रेत्याला पाहिलं? जर तुम्हाला विनोद समजला नसेल तर हा विनोद तुमच्यावर आहे, मोठे व्हा” असं प्रकाश राज यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ‘चहा विक्रेत्याबद्दल इतका तिरस्कार, जितका तिरस्कार कराल तितका तो मजबूत होईल’, ‘अभिनेता चांगला होता पण माणूस म्हणून वाईट निघाला’. ‘प्रकाश राज कधीही द्वेषाचा तुमच्यावर एवढा प्रभाव पडू देऊ नका की तुम्हाला तुमच्या देशाची आणि तुमच्या लोकांची प्रगती आणि प्रयत्नांचा तिरस्कार वाटेल’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी प्रकाश राज यांनी शेअर केलेल्या व्यंगचित्रावर केल्या होत्या.