चित्रपटसृष्टीतील कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांची चित्रपटातील भूमिका, कधी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट, तर कधी त्यांनी केलेले वक्तव्य यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे( Prarthana Behere)ने एका मुलाखतीदरम्यान ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका का सोडली यावर खुलासा केला होता.
काय म्हणाली प्रार्थना?
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने आपल्या करिअरमधील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. पवित्र रिश्ता ही मालिका तिने का सोडली, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तिने म्हटले आहे, “मला अभिनय करायचा होता. त्यामुळे मी चित्रपटात काम करायला लागले. मला चित्रपटात काम करायचं होतं; पण त्यासाठी काय करायचं होतं, हे मला माहीत नव्हतं. मी मालिकेत काम करीत होते. चित्रपटात काम करण्यासाठी मी ती मालिका सोडली. पण, त्यावेळी मला हे समजलं नाही की, मी कोणत्या प्लॅटफॉर्मवर काम करीत आहे. कोणत्या व्यक्तींबरोबर काम करीत आहे. मला किती पैसे मिळत होते याचा विचार मी केला नाही. चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठीत आले; पण मराठी चित्रपटसृष्टीत मला पहिल्या दिवसापासून संघर्ष करावा लागला. कारण- मी हिंदी मालिकेत तर काम केलं होतंच; पण त्याबरोबरच मी हिंदीमध्ये रिपोर्टिंगदेखील केलं होतं. त्यामुळे हिंदी कलाविश्वात मला जास्त लोक ओळखायचे. मराठी कलाविश्वात मला कोणीही ओळखत नव्हतं; पण मराठीत काम करायला लागल्यावर हिंदीत काम केलंच नाही. आजच्या तारखेलादेखील लोक मला विचारतात की, आता हिंदीमध्ये परत काम करायचं नाही का? पण काम करायचं नाही, असं नाही, तर काम मिळत नाही किंवा मी तसे प्रयत्न करीत नाही. कारण- मला वेळ मिळत नाही. मराठीत मला काम समोरून येतं. त्यामुळे मी आनंदी आहे.”
‘पवित्र रिश्ता’ मालिका सोडण्याचा तुझा निर्णय योग्य होता, असं तुला वाटतं का, असा प्रश्न विचारल्यावर तिने म्हटले की, तो निर्णय अयोग्यच होता. असे अनेक निर्णय आहेत, जे आता चुकीचे वाटतात. असं वाटतं की, त्यावेळी मी वेगळं काहीतरी करू शकत होते. उदाहरणार्थ- अनुराग बसु हे ‘काइट’ चित्रपटासाठी कास्टिंग करीत होते, त्यावेळी मी त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते मला म्हणाले होते की, तुला तर अभिनय क्षेत्रात यायला हवे होते. तर मी त्यांना म्हणाले की, मी रिपोर्टिंग करीत आहे. तेच ठीक आहे. खूप वर्षांनंतर जेव्हा त्यांनी मला ‘पवित्र रिश्ता’मध्ये काम करताना पाहिलं, तेव्हा ते मला म्हणाले मी तेव्हा सांगितलं होतं तेच तर करत आहेस. अशा वेळी वाटतं, अनेक लोकांनी मला विचारलं होतं; पण मी नाही म्हणाले.
दरम्यान, पवित्र रिश्ता ही मालिका झी टीव्हीवर प्रदर्शित होत होती. या मालिकेची लोकप्रियता मोठी होती. अर्चना आणि मानव या दोन पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली होती.