‘कलर्स मराठी’वर ‘काव्यांजली – सखी सावली’ ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. मालिकेमध्ये प्रेक्षकांना दोन बहिणींची प्रेमळ गोष्ट बघायला मिळणार आहे. आता लवकरच मालिकेत एक नवी एन्ट्री होणार आहे. आता नक्की हा कोण आहे ? याच्या येण्याने मालिकेत काय घडणार ? हे आपल्याला हळूहळू कळेलच.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्रसाद म्हणाला, ‘‘बिग बॉस मराठीमध्ये मला प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळालं ते मी कधीच विसरू शकणार नाही. खरं तर या प्रेमाची परतफेड करताच येणार नाही. मला ‘कलर्स मराठी’कडून ‘काव्यांजली – सखी सावली’ या मलिकेसाठी प्रीतमच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. प्रीतम या पात्राबद्दल ऐकताच मी ठरवलं की हीच असेल माझ्या चाहत्यांसाठी एक छान भेट. प्रीतमच्या भूमिकेचे पैलू लक्षात घेता, मला हे या मालिकेतील एक प्रभावशाली पात्र वाटतं. प्रीतम हा एक माध्यम प्रभावक आहे, त्याला प्रेमाविषयीचे लोकांचे प्रश्न सोडवणं, कविता करणं, त्याचं त्याच्या आईवर असलेलं अमाप प्रेम, आजच्या काळानुसार विचार करणं, असे प्रीतमचे पैलू लोकांसमोर सादर करणं माझ्यासाठी एक खूप मोठं आव्हान आहे. सर्वाना आवडणारा, लोकांच्या मनात घर करणारा, असा हा प्रीतम लवकरच तुमच्या भेटीला येतोय.’’