‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेले अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांचा नवा धमाल विनोदीपट ‘चिकी चिकी बुबूम बुम’ २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. रोजच्या जगण्यातल्या साध्यासुध्या क्षणांना खेळकर, नर्मविनोदी डूब देत त्यातून आपसूक साधली गेलेली गंमत आणि धमाल हे प्रसाद खांडेकर यांच्या चित्रपटांचं सूत्र आणि गाभा. अनेक वर्षांनी भेटण्याचा बेत आखलेल्या आणि काही विविचित्र गोष्टींमुळे कचाट्यात सापडलेल्या मित्रांची धमाल गोष्ट ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशी तिहेरी आघाडी प्रसाद खांडेकर यांनी सांभाळली आहे.

‘हास्यजत्रे’तील कलाकारांची फौज

प्रसाद खांडेकर यांनी २०२३ मध्ये ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाविषयी बोलताना, जोपर्यंत सुयोग्य कल्पना सुचत नाही तोवर मी अस्वस्थ असतो. आणि एकदा का कल्पना सुचली की मग पुढचं काम सहजपणे पार पडतं, असं खांडेकर यांनी सांगितलं. रियुनियन म्हणजे भेटूया का? हीच भावना असते आपल्या मित्रमैत्रिणींच्या मनात… मग हीच कल्पना घेऊन भेटीसाठी एकत्र जमलेल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून ही धमाल अनुभवता येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्याबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्राजक्ता माळी, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे, चेतना भट, निखिल बने अशा जवळपास सगळ्या कलाकारांची फौजच या चित्रपटात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘चिकी चिकी बुबूम बुम’ या नावामागची गंमत उलगडताना चित्रपटात ही एक व्यक्तिरेखाच असल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र या व्यक्तिरेखेभोवतीच चित्रपटाचं रहस्य दडलेलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

विनोदी लिखाणाचा बाज सांभाळता आला पाहिजे

अभ्यास, निरीक्षण, कल्पनाशक्ती आणि विचार यांचे मिश्रण विनोदी लिखाण आणि अभिनयातही असावे लागते. परिस्थितीसापेक्षतेने योग्य टायमिंग साधून केलेला विनोद आणि त्याच्या जोडीला देहबोलीतून घडणारा विनोद हा कुठल्याही विनोदीपटासाठी महत्त्वाचा भाग असतो, असं त्यांनी सांगितलं. प्रत्येक व्यक्तिरेखेत ताजेपणा, नावीन्य असेल तर रंजकता वाढते, असं त्यांनी सांगितलं.

नामवंत कलाकार एकत्र

कलाकारांच्या आणि निर्मात्यांच्या सहकार्यामुळे एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांसाठी आणता आला याचा आनंद आहे, असं सांगतानाच एवढ्या नामवंत दिग्गजांचं एकत्र येणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ‘यातील प्रत्येक कलाकाराची आपली एक खासियत आहे. विनोदी अभिनय साकारणं आणि सतत आपल्या विनोदी अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणं हे फार कठीण असतं. प्रत्येक वेळी ते योग्य प्रकारे जमवून आणण्याचं कौशल्य फार कमी लोकांमध्ये आढळतं. ही गोष्ट ज्यांना अचूक जमते अशी मंडळी चित्रपटात एकत्र आली आहेत, असं खांडेकर म्हणतात. एक वेगळा प्रयत्न ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाच्या निमित्ताने केला असून या कलाकृतीला रसिकांचं भरभरून प्रेम मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader