मनोरंजन विश्वात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसाद खांडेकर घराघरात पोहaचला आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्यानं आजवर अनेकांना खळखळून हसवलं आहे. प्रसाद त्याच्या आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. सध्या त्याच्या या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो व्यग्र आहे. अशात त्यानं एक विनोदी किस्सा सांगत ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचं नाव असं का ठेवलं याची माहिती दिली आहे.
नुकतंच ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटातील ‘बुम बुम बुम’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यानिमित्त एका मुलाखतीमध्ये प्रसाद खांडेकरनं चित्रपटाचं नाव असं ठेवावं हे कसं सुचलं, यामागचा विनोदी किस्सा सांगितला आहे. प्रसाद म्हणाला, “या सिनेमाची सुरुवात अशी झाली की, याचा बेस हॉलीवूडच्या ‘हॉलीवूड वॉक ऑफ फेम’वर रचला गेला आहे. सरांसह (निर्माते – सुनील नारकर) कुर्रर्रर्रर्र हे नाटक घेऊन आम्ही गेलो होतो. तिथे मधे बराच वेळ मिळतो. कारण- नाटकांचे प्रयोग फक्त आठवड्याच्या शेवटी असतात. त्यामुळे त्या मधल्या वेळात सुनील नारकर आम्हाला ‘हॉलीवूड वॉक ऑफ फेम’ दाखवण्यासाठी घेऊन गेले होते.”
“त्यावेळी नम्रतानं खाण्यासाठी भरपूर चिक्की आणल्या होत्या. अमेरिकेत आम्ही टेस्ला कारनं जात होतो. त्यावेळी सर तिला म्हणाले की, नमा मला एक चिक्की मिळेल का? कारमध्ये तेव्हा मी आणि माझ्याबरोबर पॅडी कांबळे (पंढरीनाथ कांबळे) होता. आम्हाला दोघांनाही विनोद सुचला”, असं प्रसादने सांगितलं.
“पॅडी म्हणाला की, सर, कुठली चिक्की हवी आहे? झिंकी चिक्की पाहिजे का? त्यावर मी म्हणालो की, सर, माझ्याकडे झिंगरी चिक्की आहे. तेव्हा सर म्हणाले की, नाही मला चिकी चिकी बुबूम बुम पाहिजे. तिथेच या चित्रपटाची मुहूर्तमेढ रचण्यात आली”, असं प्रसाद खांडेकर म्हणाला.
‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाबद्दल सांगायचं झाल्यास हा एक मल्टी स्टारर विनोदी चित्रपट आहे. त्यामध्ये स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, वनिता खरात, प्रसाद खांडेकर, असे कलाकार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद खांडेकरनं केलं आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती आणि लिखाण यामध्येही प्रसाद खांडेकरचा मोलाचा वाटा आहे. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत.