महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाला त्यादरम्यान प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘प्लॅनेट मराठी’चे अक्षय बर्दापूरकर आणि ‘गोल्डन रेशो फिल्म्स’चे पियूष सिंह यांनी ‘एबी आणि सीडी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला. आता जागतिक महामारीच्या परिस्थितीत योग्य ती काळजी घेऊन त्यांनी ‘चंद्रमुखी’ या त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रrकरणाला सुरुवात करण्याचे ठरविले आहे. अक्षय बर्दापूरकर हे सलग तिसऱ्यांदा पियूष सिंह यांच्यासोबत चित्रपटाची निर्मिती करत आहेत. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगला नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे.
याबद्दल दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाला, “दिग्दर्शक म्हणून माझा पुढील चित्रपट ‘चंद्रमुखी’च्या शूटिंगला नोव्हेंबरमध्ये सुरूवात होणार आहे. अर्थात सर्व प्रकारची योग्य काळजी घेऊनच शूटिंग केले जाईल. ब-याच दिवसांनी चित्रपटाच्या सेटवर जातोय, नवीन कामाची सुरुवात होतेय, याचा आनंद आहेच, पण त्याचसोबत जबाबदारी देखील आहे.”
हिंदी, तामिळ आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत बरेच मोठे प्रोजेक्ट्स केल्यानंतर गोल्डन रेशो फिल्म्सने ‘एबी आणि सीडी’च्या निमित्ताने मराठीतही निर्मितीची सुरुवात केली. गोल्डन रेशो फिल्म्सचे पियुष सिंह म्हणाले, “पूर्वीपेक्षा आताचा प्रेक्षक वर्ग हा चित्रपटाच्या विषयासाठी अगदी हळवा आणि संवेदनशील आहे. या चित्रपटाला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्हाला उत्तम टीम लाभली आहे. याक्षणी कलाकार आणि कथानकाविषयी फारसे बोलू शकत नसलो तरी आम्हाला खात्री आहे की प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल.”
या चित्रपटात प्रसाद ओकचे दिग्दर्शन, चिन्मय मांडलेकरची पटकथा, संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी, निलेश वाघ यांचं कला दिग्दर्शन पाहायला, अनुभवयाला मिळणार आहे. तर ब-याच वर्षांनी अजय-अतुल यांचं अस्सल मातीतलं संगीत ऐकण्याची संधी देखील मिळणार आहे.