अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास या चित्रपटाच्यानिमित्ताने रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आला. आता मराठीमधील या सुपरहिट चित्रपटाला पहिलावहिला पुरस्कार मिळाला आहे.
आणखी वाचा – अभिमानास्पद! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील दत्तू मोरेच्या ठाण्यातील चाळीला दिलं त्याचच नाव, अभिनेता म्हणतो…
प्रसाद ओकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पुरस्कार स्विकारतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. तसेच चित्रपटाला मिळालेल्या पहिल्या पुरस्काराची बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. ‘धर्मवीर’मध्ये प्रसादने आनंद दिघे यांची भूमिका हुबेहुब साकारली. चित्रपटामधील कौतुकास्पद कामगिरीबाबत त्याला ‘शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी प्रसाद अगदी भारावून गेला होता.
प्रसाद ओक काय म्हणाला?
पुरस्कार स्विकारतानाचा व्हिडीओ शेअर करत प्रसाद म्हणाला, “सांगताना अत्यंत आनंद होतोय की, आज ‘धर्मवीर’साठी या वर्षीचा ‘शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान’ मला मिळाला. हा सन्मान मी मा. आनंद दिघे साहेबांना समर्पित करतो. ही संधी मला दिल्याबद्दल दिग्दर्शक मित्र प्रवीण तरडे आणि निर्माते मित्र मंगेश देसाई यांचे मनःपूर्वक आभार. त्याचबरोबर खा.मा. श्रीकांतजी शिंदे आणि मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचेही मनःपूर्वक आभार. या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल ‘महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास’, सौ. माणिकताई व श्री पद्माकर मोरे आणि संतोष परब या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे.”
आणखी वाचा – “घरात घुसून मारलं होतं ना…”; करण जोहरवर पुन्हा संतापली कंगना रणौत, निमित्त ठरला ‘कॉफी विथ करण’ शो
पुढे तो म्हणाला, “पुरुषोत्तम बेर्डे सरांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला ह्याचाही आनंद आहेच. लोकनेत्याच्या भूमिकेसाठी लोकशाहीराच्या नावाने सन्मानित व्हावं यासारखं भाग्य नाही. श्री नटराजा…शतशः प्रणाम.” ‘धर्मवीर’ला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार प्रसादसाठी अगदी खास आहे. या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तसेच या चित्रपटामध्ये अभिनेता क्षितिश दाते, मकरंद पाध्येने देखील उत्तम काम केलं आहे.