ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसाद ओकनं ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला या चित्रपटासाठी त्याची पत्नी मंजिरीने कशाप्रकारे साथ दिली? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने फार स्पष्टपणे उत्तर दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Loksatta Exclusive: आनंद दिघेंच्या भूमिकेत प्रसाद ओकला पाहताच उद्धव ठाकरे म्हणाले, “आता बाळासाहेब….”

प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

“धर्मवीर’ चित्रपटात मंजिरीने मला फार वेगळ्या प्रकारे साथ दिली. मुळात मला दिग्दर्शक व्हायचं कारण मला दिग्दर्शन आवडतं हे आहेच, पण त्याच्याबरोबरीने मला मेकअपचा खूप कंटाळा आहे. त्यामुळे माझं झुकतं माप हे अभिनय की दिग्दर्शन तर दिग्दर्शन. कारण दिग्दर्शकाला मेकअप करावा लागत नाही. त्याला कोणताही गेटअप करावा लागत नाही. दाढी मिश्या लावा, इकडे हे चिकटवा, तिकडे ते सोल्यूशन लावा. मग ते खेचून काढा याचा मला प्रचंड कंटाळा आहे. त्यामुळे नाटकातही मी मेकअप करत नाही आणि हास्यजत्रेच्या सेटवेळीही मी डोळ्याखाली थोडं अंडराईज करतो आणि जातो. मला मेकअपचा खूप कंटाळा आहे. तासनतास बसून राहा आणि ते मेकअप करणार या दोन कारणांसाठी मुळात दिग्दर्शक झालो.

माझ्या अभिनयाच्या वर्कशॉपमध्ये ती माझी विद्यार्थिनी होती. मी पुण्यात अभिनयाचे वर्कशॉप घेत होतो आणि तिकडे आमचं जमलं. त्यामुळे मला दिग्दर्शनाची असलेली आवड आणि माझ्या चिडचिड होण्याची सर्व कारण तिला इतकी वर्षे माहिती आहेत. त्यामुळे हा चित्रपट जेव्हा आला, तेव्हा तिला मी सांगितलं त्यावेळी ती मला पटकन म्हणाली ‘दिघे साहेब म्हणजे ते ठाण्यातले, मोठा माणूस होतो तो.’ त्यानंतर तिने तिच्या पद्धतीने सर्व रिसर्च केलं, वाचलं आणि ती मला म्हणाली, ‘प्रसाद त्यांचा फोटो बघितला एवढी मोठी दाढी, मिशी आहे. तर आता…’, त्यावर मी तिला म्हणालो, “आता काय लावावी लागेल, आता फायनल झालं आहे.”

यानंतर ती मला दररोज सांगायची दाढी, मिशीमुळे वैतागू नकोस, असा रोल तुझ्या आयुष्यात परत कधी येईल तुला माहिती नाही. येईल, नाही येईल पुढचा आता आपण विचार करुया नको. आता तो आलाय तुला खूप शांतपणे, उत्तम करायचाय, अशी ती मला रोज सांगायची.

मेकअप करताना चिडचिड करु नको, असे ती रोज फोन करुन सांगायची. माझ्या मेकअप मॅनलाही ती चार ते पाच तासाने फोन करायची, सर ओके आहेत का? चिडले नाही ना? ही मदत अशा रोल करताना माझ्यासाठी फार मोलाची आहे. चंद्रमुखी किंवा हिरकणी चित्रपटात तिने प्रत्यक्ष वाटा उचलला. तसा यात तिचा अप्रत्यक्षपण वाटा होता, पण तो फार मोलाचा होता.”, असे प्रसादने यावेळी म्हटले.

“मी तुमच्या जागी असतो तर मला हे बोलता आलं नसतं…”, प्रसाद ओकने सांगितला अमिताभ बच्चनसोबतच्या भेटीचा किस्सा

दरम्यान ‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आज १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prasad oak share experience how wife manjiri oak help him for dharmaveer anand dighe role nrp