अभिनेता प्रसाद ओकच्या ‘धर्मवीर’ चित्रपटाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा होताना दिसतेय. हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे आणि प्रसाद ओक या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला चित्रपटाचा टीझर आणि अलिकडेच प्रदर्शित झालेला ट्रेलर दोन्हींची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसतेय. अशात चित्रपट प्रदर्शित होण्याआधी प्रसाद ओकनं ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला मुलाखत दिली. लोकसत्ताला या विशेष मुलाखतीत त्यानं चित्रपटाविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि सेटवरील किस्से शेअर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या या विशेष मुलाखतीत प्रसाद ओकनं या भूमिकेसाठी कशी तयारी केली तेव्हापासून ते पहिल्या दिवशी व्हॅनिटीमधून निघून सेटवर जात असताना त्याला काय अनुभव आला हे सांगितलं. प्रसाद ओक म्हणाला, “मी जेव्हा चित्रपटासाठी तयारी करत होतो तेव्हा मी तासंतास दिघे साहेबांचे फोटो पाहत बसायचो आणि विचार करायचो की या व्यक्तीची अशी कोणती गोष्ट खास आहे जी मला अवगत करायची आहे. विचार करत असताना अचानक एक दिवस माझ्या लक्षात आलं की त्यांचे डोळे खूपच बोलके आहे. ते भाव जर अभिनयातून मला दाखवता आले तर मी ही भूमिका उत्तम साकारू शकेन.”

आणखी वाचा- Loksatta Exclusive: “महाराष्ट्राची हास्यजत्राचं एक स्कीट रोज पाहिलं पाहिजे”, अमिताभ यांचा अभिषेकला सल्ला; कारण वाचून वाटेल आश्चर्य

प्रसाद पुढे म्हणाला, “मी जेव्हा शूटिंगला सुरुवात करणार होतो. त्यादिवशी माझा मेकअप वैगरे सर्व काही झालं. त्यानंतर मी आनंद दिघे यांच्या फोटोकडे पाहून हात जोडून म्हणालो, “या प्रोजेक्टला तुमचा आशीर्वाद तर पाहिजेच आहे. मलाही तुमचा आशीर्वाद हवाय आणि जर तो कशाचा रुपात द्यायचा असेल तर मला पुढच्या ५५ दिवसांसाठी तुमचे डोळे द्या. अशी मी प्रार्थना केली आणि व्हॅनिटीमधून बाहेर पडलो.”

मी व्हॅनिटीमधून आनंद दिघे यांच्या गेटअपमध्ये बाहेर पडलो अन्…
प्रसाद व्हॅनिटीमधून बाहेर पडल्याचा अनुभव सांगताना म्हणाला, “मी जेव्हा व्हॅनिटीमधून आनंद दिघे यांच्या गेटअपमध्ये बाहेर पडलो तेव्हा माझी वाट पाहत माझ्या युनिट व्यतिरिक्त ७० ते ८० लोक बाहेर उभे होते. दिघे साहेबांचे भक्त. अनेकांचे नातेवाईक, भाऊ, आत्या असे सर्वजण होते. दिघे साहेब कसे दिसतायंत हे पाहण्यासाठी ते उत्सुक होते. मी बाहेर आलो आणि लोक अक्षरशः माझ्या पाया पडायला लागले. रडायला लागले. आनंद दिघे यांच्या फार जवळचा मदन नावाचा एक माणूस मला बघायला आला होता. त्यांचं दोन दिवसांपूर्वीच डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. ते मला पाहिल्यावर चक्कर येऊन खाली कोसळले. शूटिंग सुरू करण्याआधी हे सर्व घडत होतं आणि मला ते पाहून वाईट वाटत होतं की यांचं काय करायचं. पण दुसरीकडे याच गोष्टी मला बळ देत होत्या की मी योग्य मार्गावर आहे कारण जर नसतो तर लोकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या नसत्या.”

दरम्यान ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर मांडण्याचा दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी पूर्ण प्रयत्न केला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडेच साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. हा चित्रपट १३ मे २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prasad oak share his experience of dharmveer shooting first day on set mrj