आजवर आपण अनेक खेळाडू आणि स्वातंत्र्य सैनिकांवर बायोपिक आल्याचे पाहिले आहे. एवढच काय तर अजूनही काही बायोपिक येणार असून त्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, २५० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे निळू फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले थत्तेने याबाबत खुलासा केला आहे.
गार्गीने नुकतंच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला वडीलांच्या बायोपिकविषयी विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देत गार्गी म्हणाली, ‘चित्रपटाची स्क्रीप्ट अद्याप तयार करण्यात आलेली नाही. आम्ही एक उत्तम लेखकाच्या शोधात आहोत. या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या प्रसाद ओकने प्राथमिक माहिती गोळा केली आहे. त्याने माझ्या वडिलांसोबत बराच वेळ घालवला आहे आणि त्यांच्यावर चित्रपट करण्यासाठी तो फार उत्सुक आहे. माझ्या वडिलांची भूमिका पडद्यावर साकारणाऱ्या अभिनेत्याला फायनल करणे हे खूप आव्हानात्मक काम असेल. या वर्षाच्या अखेरीस हा प्रोजेक्ट पूर्णत्वास जाईल अशी आशा आहे.’
पुढे ती म्हणाली, “माझे वडील पडद्यावर त्यांच्या खलनायकी पात्रांसाठी प्रसिद्ध होते. मात्र, ते त्यांच्या ‘वाड्यावर या बाई’मुळे जास्त लोकप्रिय होते. समाजाच्या कल्याणासाठी हातभार लावणारा तो अभ्यासू माणूस होता. एक व्यक्ती म्हणून निळू फुले कसे होते हे तरुण पिढीला कळावे अशी माझी इच्छा आहे. पण ही एक डॉक्युमेंटरी नाही.”