दूरदर्शन वाहिनीवरील जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. आता प्रसार भारतीने जुन्या मालिका पुन्हा दाखवण्यासाठी एक नवा चॅनेल लाँच केला आहे. ‘दूरदर्शनवरील तुमच्या आवडत्या जुन्या मालिका पाहण्यासाठी “DD Retro” हा चॅनेल पाहा’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

लॉकडाउनच्या काळात दूरदर्शन वाहिनीवर पुन्हा दाखवण्यात येणाऱ्या सर्व मालिका डीडी रेट्रो या वाहिनीवर दाखवण्यात येणार आहेत. रामायण आणि महाभारता शिवाय चक्रांत द्विवेदी दिग्दर्शित ‘चाणाक्य’, अभिनेते मुकेश खन्ना यांची पहिला भारतीय सुपरहिरो ‘शक्तिमान’ मालिका, कॉमेडी मालिका ‘श्रीमान श्रीमती’, बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची ‘सर्कस’, ‘ब्योमन बाकक्षी’, ‘हम है ना’, ‘तू तोता मै मैना’ आणि ‘देख भाई देख’ या मालिका पुन्हा डीडी रेट्रो वाहिनीवर दाखवण्यात येणार आहेत.

हा चॅनेल डीश टीव्हीवर सध्या मोफत दाखवण्यात येत असून या चॅनेलचा ००३ हा क्रमांक आहे. तसेच डीडी रेट्रो लवकरच इतर केबल सुविधांवर देखील दिसणार आहे.

रामायण मालिका दूरदर्शवर ऑन-एअर होताच या मालिकेने टीआरपीचे सारे विक्रम मोडीत काढले होते. त्यात भर म्हणून आता डीडी वाहिनीने हनुमान उडी घेतली आहे. २८ मार्च ते ३ एप्रिल या आठवड्यात डीडी नॅशनल वाहिनीने दमदार पराक्रम करून दाखवला आहे. २१ ते २७ मार्च या काळात हिंदी मनोरंजनाच्या वाहिन्यांमध्ये डीडी पहिल्या १० मध्ये देखील नव्हते, पण २८ मार्च ते ३ एप्रिल या आठवड्यात डीडी वाहिनी सारे विक्रम मोडीत काढत अव्वल स्थान पटकावले आहे. Broadcast Audience Research Council-Nielsen ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या यादीनुसार डीडी नॅशनल वाहिनीचा प्रेक्षकवर्ग १३ व्या आठवड्यात (२८ मार्च ते ३ एप्रिल) सकाळी ९ ते १०.३० या कालावधीत ५८० मिलियन एवढा झाला आहे. याशिवाय १३ व्या आठवड्यातील करस्पॉडिंग प्रेक्षकवर्गदेखील ८३५ मिलियन एवढा दिसून आला.