अभिनेते प्रशांत दामले लवकरच एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यांची ही भूमिका निर्मात्याची असून चंद्रलेखाची निर्मिती असलेले ‘गुण्यागोविंदाने’ हे नवे नाटक प्रशांत दामले सादर करत आहेत. महेंद्र कदम लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २३ ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतन येथे होणार आहे.
या संदर्भात ‘वृत्तान्त’ला माहिती देताना दामले म्हणाले, व्यावसायिक नाटय़ निर्माता संघातर्फे दीर्घाक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत सादर झालेले आणि पहिला क्रमांक मिळविलेले ‘दोन स्मॉल’ हे नाटक आता ‘गुण्यागोविंदाने’ या नावाने आम्ही व्यावसायिक रंगभूमीवर सादर करतो आहोत.
आपल्या प्रत्येकाच्या मनात एक छोटे मूल दडलेले असते. एखाद्याशी जेव्हा आपले भांडण होते. तेव्हा आपले मुद्दे संपले की आपण वेगळ्या पद्धतीने भांडायला लागतो. आई-वडिलांची आपल्या मुलाबाबतची प्रतिक्रियाही वेगळी असते. आपल्या मुलाबाबत ‘आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे’ अशी भूमिका आई- वडील आपल्या पाल्याबाबत घेतात. आपल्या मुलाच्या चुकीपेक्षा दुसऱ्या मुलाचेच कसे चुकले असेल, हे पटवून देण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यातून काय घडते हे या नाटकातून वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचेही दामले यांनी सांगितले.
नाटकाचे लेखक-दिग्दर्शक महेंद्र कदम म्हणाले, दीर्घाक स्पर्धेत आम्ही हे नाटक सादर केले तेव्हा ते असे मनात होते. प्रशांत दामले यांच्यामुळे हा योग जुळून आला आहे. व्यावसायिक रंगभूमीवर नाटक दोन अंकी
सादर करण्याच्या दृष्टीने काही बदल यात केले गेले आहेत.
व्यावसायिक दीर्घाक स्पर्धेत आमच्या दीर्घाकाला सवरेत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन, अभिनेता, अभिनेत्री आणि नाटक या गटांतील पारितोषिके मिळाली होती.
नाटकात एक वकील, सामाजिक जाणीव असलेली लेखिका, इंटीरिअर डेकोरेटर, फॅशन डिझायनर असा व्यवसाय असलेले आई-वडील दाखवले आहेत. त्यांच्या मुलांनी केलेल्या घोळामुळे त्यातून मार्ग काढण्यासाठी आणि समन्वयाने चर्चा करण्यासाठी ते सर्व एकत्र येतात. त्याच्या चर्चेला वेगळे वळण लागते आणि त्यांच्या भूमिका एका टोकाला जाऊन त्याचे पर्यवसान शाब्दिक चकमकीत होते, शेवटी नेमके काय घडते, ते नाटकात पाहायला मिळेल, असे सांगून कदम यांनी नाटकाबाबतची उत्सुकता कायम ठेवली. येणाऱ्या प्रेक्षकांनी वेगळ्या दृष्टिकोनातून या नाटकाकडे पाहावे. नाटकात गणेश रेवडेकर, दिशा दानडे, संचित वर्तक, सुवर्णा काळे हे कलाकार आहेत.

Story img Loader