दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ गेल्या अनेक महिन्यांपासून दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर तोडका थांबवण्यात आलं होतं. नवीन प्लॅन जमा केल्याशिवाय तोडकाम करण्यात येऊ नये असेही आदेश देण्यात आले होते. तरीही तोडकाम सुरु करण्यात आलं. त्यामुळे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दामोदर नाट्यगृहाचं जे तोडकाम सुरू करण्यात आलं आहे ते लवकरात लवकर थांबवावं तसंच सर्व कलाकारांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या. जर सर्व कलाकारांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत तर सर्व मराठी कलाकार हे आंदोलनाला बसणार आहेत. असं प्रशांत दामलेंनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास

नेमकं काय म्हणाले आहेत प्रशांत दामले?

“नोव्हेंबर महिन्यात दामोदर नाट्यगृह पाडण्यास सुरुवात झाली होती. पण अधिवेशनात प्रवीण दरेकरांनी प्रश्न उपस्थित केला होता की हे नाट्यगृह पाडू नये. त्यानंतर उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वती दिली की हे नाट्यगृह पडणार नाही. त्यानंतर आचारसंहिता लागली, आचारसंहिता लागल्यानंतर आत्ता ते पाडकाम सुरु झालं. त्यामुळे ही पत्रकार परिषद आम्ही घेतली. दोन्ही संस्था मराठी नाटकांशी आणि माणसांशी संबंधित आहेत. दोन्ही संस्था मराठी लोकांच्या आहेत, त्यामुळे सामोपचाराने गोष्टी व्हाव्यात म्हणून प्रयत्न करत होतो. पण आता परिस्थिती बदलली आहे, त्यांनी बेशीस्तपणा सुरु केल्याने आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला आहे. तोडकामाला स्थगिती दिली तरीही तोडकाम करण्यात आलं याचा अर्थ काय होतो? आमच्या काही मागण्या आणि अटी आहेत. त्या सोशल सर्व्हिस लीगने पूर्ण कराव्यात. जर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही मराठी कलाकार आंदोलन करणार. सुरुवातीचे पाच ते सहा दिवस थांबणार आहोत. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली तर ठिक नाहीतर उपोषण आंदोलनाला बसावं लागेल.” असं प्रशांत दामलेंनी म्हटलं आहे. याच पत्रकार परिषदेत बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष नीलम शिर्केही आल्या होत्या. त्यांनी याबाबत भूमिका मांडली.

काय म्हणाल्या नीलम शिर्के?

“दामोदर नाट्यगृहासाठी जे आंदोलन सुरु आहे त्यात माझा सहभाग आहे. उपोषणाला बसायची वेळ आली तरीही मी बसेन. नाट्यगृह वाचवणं अत्यंत गरजेचं आहेत. अशी नाट्यगृहं बंद झाली तर नाटकं करायची कुठे? मध्यमवर्गीय माणसं कुटुंबांना घेऊन नाटकाला येतात. गिरण कामगारांच्या वस्तीत असलेलं नाट्यगृह बंद होऊ नये ही इच्छा मनात आहेच. बंद होईल अशीही अपेक्षा नव्हती. दामोदरची परंपरा जपली गेली पाहिजे. त्यामुळे नाट्यप्रेमी, कलाकार म्हणून आम्ही आंदोलनात सहभागी होणार आहोत.” असं नीलम शिर्केंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant damle announces marathi artists will protest to save damodar theatre in mumbai scj