अर्ध आयुष्य डोळस जगलेल्या व्यक्ती अपघातामुळे अचानक दृष्टिहीन झाल्यानंतर त्यांचे काय होईल, त्यांचे दु:ख काय असेल याची कल्पनाही खरेतर डोळस व्यक्तींना करणे अवघड आहे. परंतु, लेखक-दिग्दर्शक योगेश सोमण यांनी अशी कल्पना ‘नकळत दिसले सारे’ या आपल्या नव्या नाटकाच्या माध्यमातून मांडली आहे. विशेष म्हणजे ‘विक्रमवीर’ अभिनेता प्रशांत दामले यातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहेत. ८ नोव्हेंबर रोजी हे नाटक रंगभूमीवर येत आहे. पुण्यात वेगवेगळ्या एकांकिकांमधून काम करणाऱ्या रश्मी देव यांनी जन्मांध तरुणीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.  आतापर्यंत प्रासंगिक विनोद, सांगितिक विनोदी नाटक, ब्लॅक कॉमेड, प्रेमकथा अशी वेगवेगळ्या प्रकारांतली नाटकं केली आहेत. गंभीर विषय आणि त्याचे सादरीकरण मात्र हलकेफुलके अशा स्वरूपाचे फक्त ‘लेकुरे.’ होते. याच जातकुळीतील हे नवे नाटक आहे आणि लिखाणात उजवं असल्यामुळे आणि अंध व्यक्तीची भूमिका साकारण्याचे आव्हान असल्यामुळेच स्वीकारलेले हे नाटक आहे, असे अभिनेता प्रशांत दामले यांनी  सांगितले.  मराठी रंगभूमीवर यापूर्वी नाटकांतून न मांडलेला असा अतिशय नवा विषय आहे. त्यामुळे तुलना होण्याची शक्यता नाही. पण या विषयातील गांभीर्य मांडताना त्याच्या आधी हलक्या फुलक्या विनोदाची पखरण करीत गंभीर मुद्दय़ाकडे लक्ष वेधणे अशा पद्धतीचे सादरीकरण लेखक-दिग्दर्शकाने केल्यामुळे हलक्याफुलक्या पद्धतीने गंभीर विषय अधोरेखित होतो आणि तो टायमिंग आणि अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे नवे आव्हान या नाटकाद्वारे पेलण्याचे ठरविले. म्हणूनच हे नाटक स्वीकारले असे प्रशांत दामले यांनी अधोरेखित केले.
गंभीर विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडणारे हे नाटक आहे. एक जन्मांध व्यक्ती आणि आयुष्याची ४५ वर्षे उलटल्यानंतर अपघातामुळे अंध झालेली व्यक्ती यांच्यातील देवाणघेवाण, त्यांचे नाते, त्यातील रहस्य याभोवती फिरणारे हे नाटक आहे. खूप आधी पाहिलेला ‘स्पर्श’ हा सिनेमा, अमिताभ बच्चनचा ‘आँखे’ त्याचबरोबर काही वैशिष्टय़पूर्ण प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करणे यातून या नाटकाची मध्यवर्ती कल्पना सुचली, असे नाटककार-दिग्दर्शक योगेश सोमण यांनी सांगितले. प्रशांत दामले यांना डोळ्यासमोर ठेवून नाटक लिहिले का प्रश्नाला नकारार्थी उत्तर देऊन योगेश सोमण म्हणाले की नाटकाचे व्यावसायिक वाचन प्रशांत दामले यांच्यासमोर केल्यानंतर त्यांना नाटक आवडले आणि केवळ अभिनय करण्याची तयारीच दाखवली एवढेच नव्हे तर प्रशांत दामले फॅन फाऊण्डेशनच्या वतीनेच हे नाटक रंगभूमीवर येत आहे, अशी माहितीही सोमण यांनी दिली. नाटक सहा महिने पूर्वीच लिहून तयार होते. हे नाटक नेहमीच्या पठडीतील विनोदी नाही. विनोदी नाटकांसाठी म्हणून कराव्या लागणाऱ्या गोष्टींची या नाटकात गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. जन्मांध तरुणी अपघाताने अंध झालेल्या व्यक्तीला यापुढचे आयुष्य कसे जगता येईल याची नवी जाणीव देते, नवीन ‘दृष्टि’ देते. नाटकामध्ये या दोघांच्या नात्यांतील रहस्यही आहे. त्याची उकल शेवटी होते, असेही सोमण यांनी नाटकाविषयी बोलताना सांगितले.

Story img Loader