अभिनेते प्रशांत दामले गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्यसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. चाहते फक्त त्यांचा अभिनय पाहता यावा यासाठी नाटक पाहायला जातात. नाटकांव्यतिरिक्त त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपटही केले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरही कमबॅक केले होते. सध्या रंगभूमीवर त्यांचे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक सुरु आहे.
प्रशांत दामले सोशल मीडियावर फार सक्रीय आहेत. या माध्यमाद्वारे ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. नुकताच त्यांनी फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. ते एका नाट्यगृहामध्ये पाठमोरे उभे राहून समोर असलेल्या खुर्च्यांकडे तोंड करुन उभे आहेत असे फोटो पाहिल्यावर दिसते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी “मी पोहचलो आहे… तुम्ही येताय ना? ४ वाजेपर्यंत स्थानापन्न व्हा!’, असे लिहिले आहे. आज ते त्यांच्या कारकीर्दीमधला १२,५०० वा नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. या पोस्टद्वारे त्यांनी प्रेक्षकांनी या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हायचे आवाहन केले आहे.
हा फोटो पोस्ट करण्याआधी त्यांनी फेसबुकच्या कव्हरइमेज बदलली होती. कव्हरइमेजच्या फोटोमध्येही त्यांच्या या महाकाय विक्रमाची माहिती दिली आहे. या प्रयोगाबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये खूप उत्साह आहे. त्यांनी कमेंट करत प्रशांत दामले यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचा हा प्रयोग सायनमधील श्री ष्णमुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह येथे संपन्न होणार आहे. आज सायंकाळी साडेचार वाजता प्रयोग सुरु होणार आहे.
आणखी वाचा – “मेरे घर आया एक नन्हा परा…” हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
या नाटकाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र काम करत आहे. त्यांनी नाटकांसह काही चित्रपटांमध्येही काम केले होते. या दोघांव्यतिरिक्त या नाटकामध्ये अतुल तोडणकर, प्रतीक्षा शिवणकर, मृणाल चेंबूरकर, राजसिंह देशमुख, पराग डांगे हे कलाकार काम करत आहेत. अद्वैत दादरकरने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.