हिंदी व्यावसायिक मालिकेसाठी मराठी रंगभूमीवरून काही काळासाठी अल्पविराम घेतलेले अभिनेते प्रशांत दामले पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळले आहेत. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनतर्फे सादर होणाऱ्या वसंत सबनीस लिखित ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाद्वारे दामले यांचा अल्पविराम संपला आहे. मंगेश कदम दिग्दर्शित या नाटकाचा पहिला प्रयोग १८ एप्रिल रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहे. या नाटकाचे आणखी एक वैशिष्ठय़ म्हणजे ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील जान्हवी अर्थात तेजस्वी प्रधान या नाटकात एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
रंगभूमीवरील पुनरागमनाबाबत ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना प्रशांत दामले म्हणाले, रंगभूमीवर पुनरागमन करताना माझ्या वयाला साजेसे नाटक करायचे असे ठरविले होते. ‘कार्टी काळजात घुसली’ हे नाटक पुनरुज्जीवित असले तरी मला स्वत:ला ते खूप आवडले होते. वडील आणि मुलगी यांच्या नात्यावर आधारित असलेले हे नाटक काहीसे विनोदी आणि गंभीर स्वरूपाचे आहे. वडील आणि मुलगी यांच्यातील विसंवाद आणि नंतर होणारा संवाद यात मांडण्यात आला आहे. नाटकातील ‘वडील’ ही भूमिका करणे माझे स्वप्न होते. दिग्दर्शक मंगेश कदम यांनीही फार्सिकल नाटकापेक्षा जरा वेगळे नाटक कर, असे सुचविले होते. मी बरीच नाटके वाचली आणि हे नाटक करण्याचे ठरविले.
दिग्दर्शक मंगेश कदम यांनी सांगितले, वसंत सबनीस यांचे लेखन आणि संवाद हे ‘कार्टी प्रेमात पडली’ नाटकाचे मुख्य बलस्थान आहे. वडील आणि मुलगी यांचे नाते यात मांडण्यात आले असून वडील व मुलीतील संवाद, विसंवाद आणि घरापासून दूर गेलेल्या वडिलांना पुन्हा घरात आणणे असे हे नाटक आहे. नावावरून हे नाटक विनोदी किंवा फार्सिकल वाटले तरी केवळ ते तसे नाही. ते भावनाप्रधान आणि म्हटले तर गंभीर ही आहे.
तर या नाटकातून रंगभूमीवर पदार्पणाच्या तयारीत असलेल्या तेजश्री प्रधानने ‘होणार सून..’ ही मालिका करत असतानाच दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांना मालिका सुरू झाल्यानंतर एक-दोन वर्षांनी मला नाटक करायचे आहे याची कल्पना दिली होती, असे सांगितले. त्यांच्या आणि मालिकेतील अन्य कलाकारांच्या सहकार्यामुळे मी हे नाटक करू शकते आहे. शशांकपाठोपाठ लगेच माझे हे नाटक येणे हा केवळ योगायोग आहे. मालिका आणि नाटक यांचा प्रेक्षकवर्ग पूर्णपणे वेगळा आहे. नाटकाच्या प्रेक्षकांकडून प्रत्येक प्रयोगानंतर थेट पावती मिळत असते. नाटक करताना एक कलाकार म्हणून नक्कीच वेगळा अनुभव मिळतो.
अभिनेत्री शुभांगी फावडे-लाटकर यांचीही या नाटकात महत्त्वाची भूमिका आहे. त्या म्हणाल्या, काही कालावधीनंतर पुन्हा एकदा मराठी नाटक करते आहे. मंगेश कदम आणि प्रशांत दामले यांच्याबरोबर काम करायला मिळतेय. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनतर्फे आयोजित अभिनय कार्यशाळेतून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेले पराग डांगे हेही या नाटकात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा