गेल्या काही दिवसांपासून नाटक पाहणारा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. पण अनेकदा नाट्यगृहांमध्ये गैरसोय पाहायला मिळते. नाट्यगृहांमध्ये होणाऱ्या गैरसोयीबाबत आता अभिनेता वैभव मांगलेंनी संताप व्यक्त केला आहे. त्यावर आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामलेंनी प्रतिक्रिया दिली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिलमध्ये पार पडली. त्यानंतर अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती २०२३-२०२८ ची निवडणूक मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर प्रशांत दामलेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वैभव मांगलेंनी नाट्यगृहाच्या गैरसोयीबद्दल केलेल्या संतप्त पोस्टबद्दल विचारणा करण्यात आली.
त्यावर ते म्हणाले, “मी अध्यक्ष नसतानाही या गोष्टींबद्दल बराच सतर्क होतो. अनेक ठिकाणी, विविध महापालिकांमध्ये, आयुक्तांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होतो.
उदय सामंत, शरद पवार हे आमचे ट्रस्टी आहेत. त्यामुळे ते आता अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या माध्यमातून योग्य कामाला मदत करतील, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे मला याची खात्री आहे की पुढच्या सहा महिन्यात कोणत्याही नाट्यगृहाची एसी यंत्रणा बंद पडणार नाही”, असेही प्रशांत दामलेंनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
वैभव मांगले हे सध्या ‘संज्या-छाया’ या नाटकामध्ये काम करत आहेत. पुणे, औरंगाबाद, नाशिक याठिकाणी नाटकाचे प्रयोग सुरू असताना आलेल्या अनुभवांबाबत त्यांनी भाष्य केलं.
“पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे प्रयोग ‘संज्या छाया’चे प्रयोग झाले. एकाही ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती. रंग मंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला” अशा आशयाची पोस्ट वैभव मांगलेंनी केली होती.