मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय अभिनेते म्हणजे प्रशांत दामले. गेली अनेक वर्ष दर्जेदार नाटकांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांना आनंद देत आहेत. त्यांच्या उत्स्फूर्त अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. रंगभूमीवर नाटकांचे विक्रमी १२ हजार ५०० हून अधिक प्रयोग करणारे ते अभिनेते. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना भरभरून प्रेम मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजही प्रशांत दामले यांचं नाटक म्हंटलं की मराठी प्रेक्षक हमखास गर्दी करतो. अशाच नाट्यसृष्टीतील दिग्गज माणसाच्या नाटकातून एक कुटुंब नाटक अर्धवट टाकून निघून गेलं आणि त्यांनी प्रशांत दामले यांच्यासाठी एक खास निरोपही ठेवला होता. तो किस्सा खुद्द प्रशांत दामले यांनीच एका मुलाखतीमध्ये सांगितला होता. ‘थिंक बँक’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत दामले यांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील एका नाटकादरम्यानचा सांगितला. या नाटकाचं नाव न घेता त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे.

आणखी वाचा : ‘यश राज स्पाय युनिव्हर्स’मध्ये ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारची एन्ट्री; ‘हृतिक रोशनसह ‘वॉर २’मध्ये साकारणार भूमिका

बालगंधर्वमध्ये प्रशांत दामले यांच्या एका नाटकाचा प्रयोग सुरू होता. नाटक जेव्हा संपलं तेव्हा तिकीट तपासणाऱ्या मंडळींनी ४ फाडलेली तिकीटं पुन्हा स्टेपल केलेली प्रशांत दामले यांच्या हातात आणून दिली. ती ४ तिकीटं एका कुटुंबाची होती, तब्बल १६०० रुपये देऊन त्यांनी ती खरेदी केली होती. त्यांना प्रशांत दामले यांचं हे नाटक आवडलं नसल्याने मध्यांतरातच ते कुटुंब तिकीट परत करून निघून गेले होते. त्या टिकीटाच्या मागे त्यांनी प्रशांत यांच्यासाठी एक निरोप लिहिला होता. तो असा की, “दामले हे नाटक तुमच्या लायकीचं नाही. आमची फसवणूक झाली आहे. आम्हाला आमच्या तिकिटाचे पैसे परत नकोत, आम्ही मध्यांतरातच नाटक सोडून जात आहोत.”

आणखी वाचा : अयान मुखर्जीने दिलं आणखी एक सरप्राइज; हृतिक रोशनच्या ‘या’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सांभाळणार धुरा

या तिकीटांवरील त्या ओळींनी प्रशांत दामले यांना मोठा धडा दिला. अर्थात ते नाटक तितकं खास नव्हतं हे प्रशांत दामले यांनी या मुलाखतीमध्ये मान्यही केलं, आणि नंतर काहीच दिवसांत त्यांनी त्या नाटकाचे प्रयोगही बंद केले. निर्माता म्हणून त्यांचे त्यात पैसे अडकले असल्याने त्यांनी काही प्रयोग केले, पण पैसे परत मिळाल्यावर त्यांनी ते नाटक बंदही केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant damle shares his worst experience when audience left his drama show in between avn
Show comments