अभिनेता प्रशांत दामले यांची ‘गायक’ प्रशांत दामले अशी एक वेगळी ओळख आहे. ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकात त्यांनी गायलेले ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेले आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे शब्द रसिकांच्या ओठावर आहेत. आता हेच गाणे आगामी ‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटात पुन्हा एकदा प्रशांत दामले यांच्याच आवाजात ऐकायला मिळणार आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट खूप गाजला. आता त्या चित्रपटाचा पुढील भाग ‘मुंबई पुणे मुंबई २-लग्नाला यायचं हं’या नावाने तयार करण्यात आला असून १२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रशांत दामले यांनी अभिनेता स्वप्नील जोशी याच्या वडिलांची भूमिका केली असून चित्रपटात ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकातील हे गाणे घेण्यात आले असून ते दामले यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी श्रीरंग गोडबोले व अशोक पत्की यांच्याकडे चित्रपटात गाणे घेण्याबाबतची परवानगी मागितली आणि त्या दोघानीही ती दिली. त्यामुळे नाटकातील हे लोकप्रिय गाणे आता चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना पुन्हा ऐकता येणार आहे. चित्रपटाची पटकथा व संवाद अश्विनी शेंडे यांचे असून चित्रपटात प्रशांत दामले यांच्यासह मंगल केंकरे, विजय केंकरे, सविता प्रभुणे, आसावरी जोशी, श्रुती मराठे, सुहास जोशी हे कलाकार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा