श्रीक्षेत्र जेजुरीचा सुपुत्र प्रथमेश राजेंद्र मोरे या २४ वर्षीय कलावंताने झी युवा वाहिनीवरील ‘संगीत सम्राट’ स्पर्धेत दुसर्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केल्याचे रविवारी झालेल्या कार्यक्रमात जाहिर झाले. यानंतर जेजुरीकरांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. सोमवारी जेजुरी ग्रामस्थांच्यावतीने शहराच्या मुख्यचौकातून पारंपारिक सनई-चौघड्यांच्या सुरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि भंडार्याच्या उधळणीत त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. मुख्य बाजारपेठेतून सुवासिनींनी औक्षण करीत प्रथमेशला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वाचा : सुबोध-सोनालीची केमिस्ट्री ‘तुला कळणार नाही’
गेला आठवडाभर प्रथमेशचे काय होणार ही उत्कंठा जेजुरीकरांना लागून राहिली होती. वाहिनीवर कार्यक्रम सुरु होताच जेजुरी शहरातील रस्ते ओस पडले होते. गायक आदर्श शिंदे, अभिनेत्री क्रांती रेडकर ज्येष्ठ कलावंत सचिन पिळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘सॅक्सोफोन’ वादक प्रथमेशला दुसर्या क्रमांकावर संगीत सम्राट किताब आणि एक लाख रुपये व सन्मानचिन्ह जाहिर होताच ग्रामस्थांनी त्याच्या निवासस्थानी जाऊन आनंदोत्सव साजरा केला. खंडेरायाच्या मंदिरात सनई-चौघडा वादनाची परंपरा असलेल्या मोरे घराण्यातील प्रथमेशने जेजुरीच्या वैभवात मानाचा तुरा रोवला असल्याचे उदगार प्रकाश खाडे यांनी काढले.
वाचा : नीलकांती पाटेकर यांच्या घरी पोहोचला खास पाहुणा
अत्यंत सर्वसामान्य आणि प्रतिकूल परिस्थिती असलेल्या प्रथमेश मोरे याचे आजोबा नारायण गंगाधर मोरे हे खंडोबा मंदिरात सनई -चौघडा वादनाचे काम करायचे. पुढील पिढीत राजेंद्र नारायण मोरे यांनी हा मानपान जोपासत बँडपथक सुरु केले. या वादनात आजोबांचा वारसा व वडिलांकडून लहानग्या प्रथमेशला वाद्य वाजविण्याचे धडे मिळू लागले. संगीतकार कल्याणजी-आनंदजी, शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, रवींद्र जैन आदी नामवंत संगीतकारांबरोबर काम केलेले ‘सॅक्सोफोन’ वादक राजनाथसिंग सोडा, सुरेश यादव यांच्याकडे प्रथमेशने सॅक्सोफोन हे अवघड वाद्य वाजविण्याचे धडे गिरवले. जो इतर वाद्य वाजविण्यात पारंगत असतो तोच सँक्सोफोन वाजवू शकतो.
चार महिन्यापूर्वी सुरु झालेल्या झी युवाच्या संगीत सम्राट स्पर्धेमध्ये सहा हजार कलावंतामधून ३०० कलावंत निवडले गेले. त्यानंतर १०० ,५० ,२४ ,१२ ,८ ,५ अशा क्रमवारीतून दुस-या क्रमांकावर प्रथमेशने आपले स्थान बळकट केले. या वाद्याचा दररोज किमान ८ ते १० तास प्रथमेश रियाज करतो.