सध्या राज्यभरात ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. प्रवीण तरडे यांच्या लेखणीतून उभा राहिलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. प्रवीण तरडे यांनीच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. शेतकरी, गुन्हेगारी आणि पोलीस यांच्यावर आधारित असणाऱ्या या चित्रपटातील संवाद विशेष गाजत आहेत. विशेष करुन तरुण वर्गाला हा चित्रपट प्रचंड आवडत आहे. चित्रपटाचा विषय आणि त्यातील संवाद पाहता सेन्सॉर बोर्डाने त्याला ‘अ प्रमाणपत्र’ दिलं आहे. यावर प्रवीण तरडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी साताऱ्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मराठी चित्रपटांनी आयुष्यभर आई-वडिलांच्या गोड गप्पाच करायच्या का ? असा संतप्त सवाल प्रवीण तरडे यांनी सेन्सॉर बोर्डाला विचारला आहे. तसंच मराठी चित्रपटाचं सेन्सॉर बोर्ड भयानक आहे असंही ते म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी सेन्सॉर बोर्डाने नेमका कोणत्या गोष्टींवर आक्षेप घेतला आणि आपल्याला कोणत्या गोष्टी खटकल्या याबद्दल सविस्तरपणे सांगितलं. चित्रपटाला ‘अ प्रमाणपत्र’ मिळालं नसतं तर कदाचित जास्त कमाई झाली असती असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
‘मराठी चित्रपटसृष्टीने आयुष्यभर आई-वडिलांच्या घरातल्या गोड गोड गप्पाच करायच्या का ? ओ बाबा अहो इकडे या…काय ग मुली..मग ते प्रेम…असले चित्रपट करायचे का ? मराठी चित्रपटांना पुढे जाऊ दिलं पाहिजे. मराठी माणूसही मारामारी करतोय, मराठी माणूसही खून करतोय, मराठी माणूस जमिनी विकतोय…मराठी माणूस सगळं करतोय ना’, अशी विचारणा त्यांनी यावेळी केली.
चित्रपटात एक गुन्हेगार दुसऱ्या गुन्हेगाराला देत असलेल्या शिवीवरही आक्षेप घेतला गेल्याचं प्रवीण तरडे यांनी यावेळी सांगितलं. शिवी काढून तिथे मुर्खा हा शब्द वापरा असा अजब सल्ला दिल्याचंही ते बोलले. लेखकांची अर्धी ऊर्जा त्यांना समजावण्यात वाया जात असल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, सेन्सॉर भयाण आहे. इतकं भयाण आहे की 23 तारखेला चित्रपट रिलीज होणार होता, आणि 22 तारखेला दुपारी 1 वाजता मला सेन्सॉर दिलं. एक मोठी यादीच देण्यात आली होती.
‘शाळेतल्या मुलांनी अंगठे धरण्यावरही सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला. यावर तारे जमीन पर चित्रपटाचं उदाहरण दिलं तर आम्हाला हिंदीचं काही सांगू नका असं सांगत हात वर केले’, अशी माहिती प्रवीण तरडे यांनी दिली आहे. सेन्सॉर बोर्डाने आपले निकष बदलले पाहिजेत अशी मागणी प्रवीण तरडे यांनी केली आहे.
‘एखाद्या समाजाचं जगणं त्याच्या भाषेत असतं. भाषा त्या समाजाला, मातीला व्यक्त करते. भाषेला त्या मातीचा वास असतो. जातीवाचक असेल तर नक्की काढलं पाहिजे त्याला पाठिंबा आहे. पण त्या सिनेमातलं जगणं हिरावून घेऊ नका’, अशी विनंती प्रवीण तरडे यांनी सेन्सॉर बोर्डाला केली.