‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर दिग्दर्शक-अभिनेता प्रवीण तरडेला एक नवी ओळख मिळाली. संवेनशील लेखक, दर्जेदार अभिनेते, उत्तम निर्मितीमूल्य जपणारे निर्माते-दिग्दर्शक म्हणून नावारूपास आलेला प्रवीण तरडे एकेकाळी कबड्डी व सॉफ्टबॉलचा राष्ट्रीय खेळाडू सुद्धा होता. ही ओळख काहीशी प्रेक्षकांसाठी नवीन असली तरी त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहता येणार आहे ते म्हणजे ‘सूर सपाटा’ या आगामी मराठी चित्रपटात. ‘सूर सपाटा’मध्ये कबड्डी सामन्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या ‘पंच’ची भूमिका प्रवीण तरडे साकारताना दिसणार आहे. लाडे ब्रोज फिल्म्स प्रा. ली. प्रस्तुत जयंत लाडे निर्मित आणि मंगेश कंठाळे दिग्दर्शित ‘सूर सपाटा’ होलिकोत्सवाचे औचित्य साधत २१ मार्चला रसिक-प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

‘पिंजरा’, ‘कन्यादान’, ‘तुझं माझं जमेना’ यांसारख्या मालिकांचे लेखन असेल अथवा ‘कुटुंब’, ‘पितृऋण’, ‘रेगे’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या संवेदनशील चित्रपटांचे कथा-पटकथाकार-संवादलेखक शिवाय ‘देऊळ बंद’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रातही उडी घेणारा प्रवीण तरडे मनोरंजन क्षेत्राच्या मैदानात एकामागोमाग-एक यशस्वी सूर मारताना दिसतो. ‘सूर सपाटा’निमित्ताने कबड्डीचे रंगतदार सामने, स्पर्धकांची जिंकण्यासाठी चाललेली चढाओढ, दोन्ही बाजूच्या स्पर्धक कंपूतील इरिशिरी पाहताना प्रेक्षकांचीही उत्कंठा शिगेला पोहचणार हे नक्की.

वाचा : या देशात साजरा केला जातो ‘श्रेया घोषाल दिन’

या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के, शरयू सोनावणे, निनाद तांबावडे आदींसोबत हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव, दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, उपेंद्र लिमये, लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, आनंद इंगळे, संजय झाडबुके, अभिज्ञा भावे आणि नेहा शितोळे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सिनेमॅटोग्राफर विजय मिश्रा असून अभिनय जगतापचे श्रवणीय संगीत चित्रपटाला लाभले आहे.

Story img Loader