दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे (Pravin tarde) सध्या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. प्रवीण तरडे यांचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट सध्या बॉक्सऑफिसवर तुफान चालत आहे. तर दुसरीकडे ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सगळ्यात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रवीण तरडेंनी धर्मवीर या चित्रपटाविषय एक मोठा खुलासा केला आहे.
प्रवीण तरडेंनी या मुलाखतीत कोणत्या प्रसंगातून त्यांना प्रेरणा मिळाली या विषयी सांगितले आहे. “अगदी नाट्यमय वाटेल असा एक किस्सा आहे. धर्मवीरचं ठाण्यात शूटिंग करताना रोज अशी अनेक माणसं सेटवर यायची जी लाखोंनी पैसे देऊ करायची. तिथल्या लोकांना साहेबांबद्दल एवढी श्रद्धा वाटते की लोक काहीतरी हातभार म्हणून पैसे द्यायला यायचे. एका माणसाने तर चक्क २१ लाख रुपये देऊ केले होते. तर दुसरीकडे एका वृद्ध आजींनी येऊन २०० रुपये हातभार लावण्यासाठी देऊ केले होते”, असे प्रवीण म्हणाले.
आणखी वाचा : जेव्हा माधुरी, सलमान आणि शाहरुख एकत्र येतात…, फोटो व्हायरल
आणखी वाचा : ‘सरसेनापती हंबीररावां’चे साऊथ स्टाईल स्वागत, कर्नाटकात पोस्टरवर केला दुग्धाभिषेक
या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका ही अभिनेता प्रसाद ओकने साकारली आहे. दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती ही मंगेश देसाई यांनी केली. चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला असून धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत आहे.