प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट २७ मे २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्यानिमित्ताने प्रवीण तरडे, महेश लिमये आणि टीमने लोकसत्ता ऑनलाइच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या पडद्यामागचे किस्से शेअर केले. यासोबतच या मुलाखतीत त्यांना दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती असलेल्या हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीच्या नावाची इतिहासात नोंद नसल्याची खंत व्यक्त केली.
दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीची भूमिका प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे यांनी साकारली आहे. मात्र चित्रपटाची तयारी करत असताना प्रवीण तरडे जेव्हा हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीचं नाव शोधत होते. तेव्हा त्यांना काय अनुभव आला आणि इतिहासात हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीच्या नावाची नोंद नसताना मग चित्रपटात त्यांना नाव कसं देण्यात आलं याचा किस्सा प्रवीण तरडे यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.
आणखी वाचा- ‘…अन् बाकी सगळे कोमात’ वल्ली आणि माई मावशीचा धम्माल व्हिडीओ पाहिलात का?
प्रवीण तरडे म्हणाले, “जेव्हा मी चित्रपटाची तयारी करत होतो तेव्हा एक इतिहासकार माझ्याशी तावातावने भांडले. मी त्यांना साधं एवढंच म्हणालो होतो की, जगाला सरसेनापती माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज सर्वांना माहीत आहेत. त्यांच्या बायका म्हणजे महाराण्यांची नावं सर्वांना माहीत आहे. पण ज्या सरसेनापतींनी जग जिंकलं त्यांची पत्नी आणि जिच्या पोटी ताराराणी जन्माला आल्या त्या माऊलीचं नावच नाहीये इतिहासात. मी त्यांना बोलताना म्हणालो, इतिहासाने फक्त पुरुषांना मोठं केलं. पण ज्या माऊलीच्या पोटी त्यांनी जन्म घेतला त्यांना मात्र विसरले.”
प्रवीण तरडे पुढे म्हणाले, “आम्ही बरंच शोधलं पण इतिहासात हंबीरराव मोहितेंच्या पत्नीचं नावच सापडेना. जेव्हा मी म्हणलो, ताराराणींसारख्या कर्तबगार स्त्रीची इतिहासाने दखल घेतली पण जिच्या पोटी ताराराणींचा जन्म झाला त्यांच्याबाबत मात्र इतिहासात नोंदच नाही. त्यावर ते इतिहासकार माझ्यावर तुटून पडले. मग मी त्यांना म्हणालो तुम्ही भांडण्यापेक्षा मला उत्तर द्या. नंतर मी विक्रमसिंह बाजी मोहिते यांच्याशी संपर्क केला. तर ते मला म्हणाले हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीच्या नावाचा संदर्भ सापडत नाहीये. पण आम्हाला चित्रपटात हंबीररावांची पत्नी दाखवायची होती. त्यांचं कुटुंब दाखवायचं होतं. त्यांच्या नावाचा संदर्भ इतिहासात नसला तरी चित्रपटासाठी ते अनिवर्य होतं त्यामुळे मग आम्ही ताराराणींच्या आईचं चित्रपटात नाव ‘लक्ष्मीबाई’ असं दिलं.”
दरम्यान ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट येत्या २७ मे ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन, कथा, पटकथा-संवाद लेखन प्रवीण तरडे यांनी केलं आहे आणि सोबतच मुख्य भूमिका देखील त्यांनीच साकारली आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.