राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या केतकी चितळेविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. सध्या केतकी चितळे न्यायालयीन कोठडीत आहे. याबाबत आता अभिनेते प्रवीण तरडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रविण तरडे पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
“केतकी प्रकरणाबद्दल मला खरच काही माहिती नाही. हे प्रकरण झालं तेव्हा धर्मवीर चित्रपटाचे अंतिम काम सुरू होते. ते झाल्यानंतर प्रमोशनमध्ये वेळ गेला. ते संपल्यानंतर तीन दिवस हंबीराव चित्रपटाचे अंतिम काम सुरू केलं. त्यामुळं काय झालंय हे माहीत नाही. परंतु, कुठल्याच अभिनेत्याने विशिष्ट राजकीय पक्षाची भूमिका घेऊ नये या मताचा मी आहे. मी चित्रपट काढला तर प्रत्येक घटक बघणार आहे. माझ्यावर प्रेम करणार आहे. माझ्या अभिनयामुळं, कामांवर प्रेम केल्यामुळं त्यांचा आयडॉल झालो आहे. त्याचा वापर मी कुठल्या राजकीय पक्षसाठी नाही केला पाहिजे,” असे प्रवीण तरडे म्हणाले.
“आपल्यावर प्रेम करणारी माणसे सर्वांची आहेत. त्यामुळं कुठल्याच अभिनेत्याने एक विशिष्ट भूमिका कधीच घेतली नाही पाहिजे. अभिनेता हा सर्वांचा असतो. काही विशिष्ट लोक येत नाहीत त्याचा सिनेमा पाहिला. कलाकृती समाजाची आहे. कलाकार हा समाजाच देणं असू शकतो. समाजाने प्रश्न विचारावेत त्यानं त्याच उत्तर द्यावे या मताचा मी आहे. त्यामुळे प्रवीण तरडे तुम्हाला आयुष्यात कधी कुठल्या राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही. ज्या दिवशी ते करेल तेव्हा त्याच दिवशी हे क्षेत्र बंद करेल. दोन्ही क्षेत्राचा वापर एकमेकांसाठी नाही करायचा. एक कुठलं तरी पूर्ण वेळ असावं. कलाकार, नट हा समाजाचं देणं फेडण्यासाठी जन्माला आला आहे,” असेही प्रवीण तरडे म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात समाजमाध्यमावर हिणकस लिखाण करणारी अभिनेत्री केतकी चितळेचा जामीन अर्ज न्यायालयाने २६ मे रोजी फेटाळला होता. केतकी चितळेला १४ मे रोजी अटक करण्यात आल्यानंतर तिने न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर जामीन अर्ज ठाणे न्यायालयाकडे केला होता तो फेटाळण्यात आलाय. मागील १५ दिवसांहून अधिक काळापासून केतकी अटकेत आहे. असं असतानाच आता दुसरीकडे केतकीने शरद पवारांबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. केतकीबद्दल आक्षेपार्ह भाषेमध्ये वक्तव्य केली जात असून अशी वक्तव्य करणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे.