प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून प्रवीण तरडे यांना ओळखलं जातं. ‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’ असे त्यांचे एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. त्यांच्या या चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता प्रवीण यांना त्यांच्या कामामधून निवांत वेळ मिळाल्यानंतर सध्या ते पत्नी स्नेहल तरडेबरोबर लंडन येथे सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. त्यांनी नुकतीच लंडन येथील एका बाजरपेठेला भेट देत तिथल्या मराठी शेतकऱ्यांची ओळख करून दिली.
प्रवीण तरडे यांनी त्यांच्या फेसबुकवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते लंडनमधील एका मोठ्या मार्केटच्या बाहेर उभे असलेले दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी ही बाजारपेठ कशी आहे आणि यात मराठी शेतकऱ्यांनी कशाप्रकारे आपलं वर्चस्व निर्माण केलंय हे सांगितलं आहे. तसेच मराठमोळे शेतकरी सचिन कदम आणि निरज रत्तू यांची ओळख करून दिली आहे. यापैकी सचिन कदम हे मुळचे रत्नागिरीतील चिपळूण येथील रहिवासी आहेत तर निरज रत्तू हे पुण्यातील शिरूर येथील रहिवासी आहेत.
प्रवीण तरडे यांनी मराठी शेतकरी लंडनसारख्या ठिकाणी काम कसं करतात. पैशांची आणि शेतमालाची किती मोठी उलाढाल होते. तसेच कोणकोणत्या भाज्या आणि फळं ते भारतातून परदेशात मागवतात याची माहिती या व्हिडीओमधून दिली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना प्रवीण तरडे यांनी, ‘लंडन मधील वेस्टर्न इंटरनॅशनल भाजी आणि फळ मार्केट वर मराठी शेतकऱ्यांचा पगडा.. जय महाराष्ट्र’ असं कॅप्शन दिलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.
आणखी वाचा- VIDEO : लंडनमध्ये प्रवीण तरडे यांनी जपली मराठी संस्कृती, म्हणाले, “इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे की…”
दरम्यान अनेक युजर्सनी प्रवीण तरडे यांच्या या व्हिडीओवर कमेंट केल्या आहे. त्यांचं कौतुक केलं आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि शेतीबाबत प्रवीण तरडे यांना विशेष प्रेम आहे. त्यांचं बोलणं, वागण्यामधून ते नेहमीच दिसून येतं. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात ते गेले तरी त्यांना मराठी संस्कृतीचा विसर पडत नाही. लंडनमध्ये देखील त्यांनी आपली मराठमोठी संस्कृती जपली आहे आणि तिथल्या मराठी शेतकऱ्यांचं देखील कौतुक केलं आहे.