बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या ‘गर्ल ऑन द ट्रेन’ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. सिनेमातील परिणीतीच्या भूमिकेला चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय. या पाठोपाठ परिणीतीने तिच्या आगामी सिनेमाची तारीख जाहीर केलीय.

परिणीती चोप्रा बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालच्या बायोपिकमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर परिणीतीने सोशल मीडियावर शेअर केलंय. ‘सायना’ असं या सिनेमाचं नाव असून 26 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर सिनेमासाठी परिणीती चोप्राने खूप मेहनत घेतली आहे.या आधी अभिनेत्री श्रद्धा कपूरला या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आलं होतं. मात्र कालांतराने काही कारणास्तव श्रद्धाऐवजी परिणीतीला कास्ट करण्यात आलं.

या भूमिकेसाठी परिणीती गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेतेय. परिणीतीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही फोटो अपलोड केले होते. यात तिने सकाळी 5 वाजताच ती दिवसाची सुरुवात करत असल्याचं म्हंटलं होतं. वर्कआउट करुन सकाळी 6 वाजताच ती सराव सुरु करत होती. एका फोटोत परिणीतीने सायना नेहवालला टॅग केलंय. या फोटोला “आधी आणि नंतर.. तू हे कसं करतेस?” असं कॅप्शन परिणीतीने दिलं होतं. यात तिने दोन फोटो पोस्ट केले होते. एका फोटोत ती बॅटमिंटन खेळताना दिसतेय तर दुसऱ्या फोटोत दमल्यानंतर जमिनीवर ती झोपून गेल्याचं दिसतंय.

या सिनेमातील परिणीतीचा लूक आधीच समोर आलाय. सायना नेहवालने तिच्या ट्विटरवरुन परिणीतीचा लूक शेअर केला होता.
या फोटोला सायनाने  ‘माझ्या सारखीच दिसणारी’ असं कॅप्शन दिलं होतं.

2012 सालच्या ऑलिंपीक स्पर्धांमध्ये सायना नेहवालने कांस्य पदक पटकावलं आहे. तसंच आपल्या उत्कृष्ट खेळाने अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारली. अनेक नवे विक्रम तिने गाठले आहेत. सायनाच्या याच कामगिरीची झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Story img Loader