इस्लाम धर्मासाठी बॉलिवूड सोडणारी अभिनेत्री सना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सना सध्या गरोदर आहे आणि ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावरून चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिची आई तिच्या शूजचे लेस बांधताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत सनाने भावुक कॅप्शन लिहिलं आहे.
गरोदर सना खानला वाकता येत नाहीये, अशात तिच्या आईने तिची मदत केली आहे. त्याचाच व्हिडीओ शेअर करत सनाने लिहिलं, “मी चालायला जाऊ शकावं, यासाठी माझी आई माझ्या शूजचे लेस बांधत आहे. आईच्या प्रेमापेक्षा खरं आणि निस्वार्थ प्रेम दुसरं नाही. हा व्हिडीओ पोस्ट करावा लागला, कारण तिने आपल्याला दिलेलं प्रेम आपल्यासाठी केलेला त्याग आपण नेहमी विसरतो. तुमचं वय कितीही असलं तरी तुम्ही त्यांच्यासाठी नेहमीच लहान मूल असता.”
हेही वाचा – कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत
सना पुढे म्हणाली, “मला शूजचे लेस बांधण्यासाठी वाकता येत नव्हते. त्यावेळी मी रडत होते पण आता हा व्हिडीओ पाहून कॅप्शन लिहितानाही मला रडू येत आहे. मी माझ्या बाळाला माझ्या आईसारखे प्रेम देण्यासाठी वाट पाहू शकत नाही. मी थोडी जरी माझ्या आईसारखी होऊ शकले, तर ते पुरेसे असेल.”
दरम्यान, सना खानचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी कौतुक करत आहेत. ‘आईचं प्रेम निस्वार्थ असतं, आपल्या मुलाची काळजी आईइतकी कोणीच घेऊ शकत नाही, तू खूप नशीबवान आहेस,’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.