बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने आपला माजी प्रियकर उद्योजक नेस वाडियाच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केल्याने दोघांमधील भांडणाला आता कायदेशीर लढाईचे रूप आले आहे. नाईलाज झाल्यानेच अखेर पोलिसांत तक्रार दिल्याचे प्रीती झिंटाने म्हटले आहे. तर या सर्व प्रकारामुळे आपल्याला धक्का बसून हे आरोप निराधार असल्याचा दावा नेस वाडिया यांनी केला आहे. या आरोपांची शहानिशा करण्यासाठी ‘आयपीएल’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचाही जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे मरीन ड्राईव्ह पोलिसांनी सांगितले.
वानखेडेवर ३० मे रोजी ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ आणि ‘चेन्नई सुपर किंग्ज’ यांच्यात सामना रंगलेला असताना नेस वाडियाने आपला विनयभंग के ला असल्याचे प्रीती झिंटा हिने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. स्टेडियमवर उपस्थित असलेल्या लोकांसमोर नेसने आपल्याला अत्यंत वाईट भाषेत शिवीगाळ केल्याचे आणि धमकावल्याचेही प्रीतीने म्हटले आहे. प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यात पाच वर्ष प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र, त्यांचे नाते कधीच संपुष्टात आले असून केवळ ‘किं ग्ज इलेव्हन पंजाब’ या आयपीएल टीमच्या मालकीत दोघेही भागीदार म्हणून एकत्र आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यादिवशीचे सीसीटीव्ही फुटेज बघून उपस्थित लोकांना साक्ष देण्यासाठी बोलवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोणत्याही महिलेला अशा वादविवादात अडकणे आवडत नाही -प्रीती झिंटा
माध्यमांनी या प्रकरणाचे वृत्त दिल्यावर प्रीतीने फेसबुकवर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही महिलेला अशाप्रकारच्या वादविवादात अडकोयला आवडत नाही. मात्र, नेसकडून आपल्याला मिळत असलेल्या वाईट वागणुकीने टोक गाठले असून नाईलाजाने आपल्याला हे कठोर पाऊल उचलावे लागल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
संपूर्ण निवेदनात प्रीतीने कु ठेही नेसचा नावाने उल्लेख केलेला नाही. मात्र, वानखेडेवर घडलेल्या प्रसंगानंतर जो तो आपापल्या पद्धतीने माझ्या चारित्र्याविषयीची कथा ऐकवतो आहे. या प्रकरणातले सत्य कोणीही सांगायला तयार नाही, असे स्पष्ट करत या प्रकरणातले साक्षीदार पोलिसांना सत्य काय ते सांगतील आणि पोलिसही त्यांची भूमिका चोख बजावतील, असा विश्वासही प्रीतीने व्यक्त केला आहे. गेली १५ वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीत आपण अभिनेत्री म्हणून वावरलो आहोत पण, असे वर्तन माझ्याबरोबर कोणीही केले नव्हते. आजपर्यंत आपण नेसविषयी माध्यमांसमोर काहीही बोललो नाही. पण, आता स्वाभिमान जपण्यासाठी का होईना माध्यमांकडे ही भूमिका मांडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे प्रीतीने म्हटले आहे. कामाच्या जागी माझी प्रतिष्ठा जपली गेलीच पाहिजे आणि त्यासाठी आपण हा लढाईचा पर्याय निवडला असून माध्यमांनी त्याला रंजक स्वरूप देऊ नये, अशी विनंतीही प्रीतीने केली आहे.
महिला आयोगाकडून चौकशी होणार
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने आपला माजी प्रियकर आणि उद्योगपती नेस वाडिया याच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वत:हून दखल घेतली असून या बाबत सविस्तर चौकशी करण्याचे ठरविले आहे.
प्रीती झिंटा हिच्या तक्रारीची आम्ही दखल घेतली असून त्याची स्वत:हून चौकशी करण्याचे ठरविले आहे, असे आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा यांनी सांगितले. प्रीती झिंटा २००९ पर्यंत वाडिया यांच्यासमवेत वास्तव्य करीत होत्या असे आपल्याला मीडियातील वृत्तावरून समजले आहे. मात्र त्यामुळे काहीही फरक पडत नाही. वाडिया याने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप शुक्रवारी झिंटा हिने केला आहे. जर ही वस्तुस्थिती असेल तर चौकशीतून जे निष्पन्न होईल त्यानुसार आम्ही कारवाई करू, असे शर्मा म्हणाल्या.
झिंटा आणि वाडिया हे आयपीएल स्पर्धेतील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे संयुक्त मालक आहेत. वाडिया याने आपला विनयभंग केला, शिवीगाळ केली आणि ३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर आपल्याला धमकी दिली, अशी तक्रार झिंटा हिने पोलीस ठाण्यात केली आहे.
या प्रकरणावर मीडियातून प्रकाशझोत टाकण्यात आल्यानंतर झिंटा हिने स्पष्ट केले आहे की, कोणालाही दुखावण्याचा आपला हेतू नाही तर केवळ स्वसंरक्षण हाच हेतू आहे. त्यामुळे खासगी बाबींसंबंधात गुप्तता पाळावी, अशी विनंती झिंटा हिने केली आहे. वाडिया आणि झिंटा यांच्यात असलेल्या घनिष्ट मैत्रीत काही वर्षांपूर्वी वितुष्ट आले होते.