चित्रपट निर्माते कमल अमरोही यांचा मोठा मुलगा शानदार याच्या वारसांना मालमत्ता विकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मज्जाव केला. तसेच शानदार यांच्या बँक खात्यांचा तपशीलही पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे आदेश दिले. अभिनेत्री प्रीती झिंटा हिने केलेल्या दाव्यावरील सुनावणीच्या वेळेस न्यायालयाने हे आदेश दिले.
न्यायमूर्ती एस. जे. काथावाला यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने शानदार यांच्या वारसांना प्रीतीच्या दाव्यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. प्रीतीने शानदार यांना अन्य एका प्रकरणात कायदेशीर लढाईसाठी दोन कोटी रुपयांची मदत केली होती. परंतु शानदार यांचे दरम्यान निधन झाले आणि तिचे दोन कोटी रुपये तिला परत मिळालेले नाहीत.
वारंवार मागणी करूनही शानदार यांच्या वारसांनी ते परत न केल्याने अखेर प्रीतीने न्यायालयात धाव घेत त्यांच्याविरुद्ध दावा केला आहे. या दाव्यात तिने मूळ रक्कमेसह शानदार यांच्या निधनाच्या दिवसापासूनचे रक्कमेवरील व्याज म्हणून ८० लाख रुपये देण्याचीही मागणी केली आहे.
२२ ऑगस्ट २०११ रोजी शानदार यांचे निधन झाले होते. याशिवाय दाव्याची सुनावणी प्रलंबित असेपर्यंत शानदार यांची मालमत्ता विकण्यापासून त्यांच्या वारसांना मज्जाव करावा, अशी विनंतीही प्रीतीने दाव्यात केली आहे.

Story img Loader