सर्वसामान्यांपासून ते विविध क्षेत्रातील सेलिब्रेटींपर्यंत बॉलिवूडचे खास आकर्षण आहे. बॉलिवूडच्या चित्रपटांचा आणि कलाकारांचा प्रभाव समाजावर तसेच फॅशन, जाहिरात आणि विपणन (मार्केटिंग) क्षेत्रावरही मोठय़ा प्रमाणावर होत असतो. वेगवेगळे फॅशन शो, ज्लेवरी शो किंवा एखाद्या उत्पादनाच्या प्रसिद्धीसाठी बॉलिवूडच्या ताऱ्यांचा विशेषत: तारकांचा उपयोग करून घेण्यात येतो. मुंबईत सध्या सुरू असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय दागिने सप्ताह (इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी विक)चा तिसरा दिवस बॉलीवूडच्या काही तारकांनी गाजवला. प्रीती िझटा ‘जोधाबाई’ झाली तर दिया मिर्झा ‘हैदराबाद राणी’ निलोफर झाली होती.
राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अशा शोमधून बॉलीवूडच्या तारकांच्या माध्यमातून दागिने किंवा कपडय़ांची जाहिरात व प्रसिद्धी केली जाते. या शोज्चा चांगला फायदा मोठय़ा उत्पादक कंपन्यांना होत असतो. इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी विकमध्ये बॉलीवूडच्या तारका सहभागी होत असतात. मुंबईतील या शोमध्ये प्रीती झिंटा लाल रंगाच्या व सोनेरी वर्ख असलेल्या पेहेरावात सहभागी झाली होती. तिने आपल्या या वेशभूषेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रीती झिंटा हिने इतिहासातील ‘जोधा’बाई साकारली होती. तर दिया मिर्झा हिने पांढरा, सोनेरी आणि करडय़ा रंगाचा पोशाख परिधान केला होता. प्रीती िझटा व दिया मिर्झा या दोघींच्या या विशेष पेहेरावाची उपस्थितांमध्ये चर्चा होती. या दोन्ही तारकांनी बिरदीचंद घनश्यामदास ज्वेलर्सचे दागिने आणि सौंदर्य अलंकार परिधान केले होते. या ‘स्टार’ तारकांसह शोमध्ये ‘हिरोपंती’ चित्रपटातील अभिनेत्री कृती सेनन तसेच आदिती राव हैदरी, कियारा आडवाणी, सोफी चौधरी, इलियाना डी क्रूज, ऋचा चढ्ढा या तारकाही ‘रॅम्प’वर सहभागी झाल्या होत्या.