रसिका शिंदेदे
कुटुंबीयांकडून अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या अनेक अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे काजोल. हिंदूी चित्रपटसृष्टीत गेली तीस वर्ष यशस्वी कारकीर्द पूर्ण करणारी काजोल सध्या निवडक, चोखंदळ भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येते आहे. एकीकडे चित्रपटसृष्टीतील कारकीर्द यशस्वीरीत्या पार करत असताना दुसरीकडे आई म्हणूनही आपल्या जबाबदाऱ्या ती चोखपणे सांभाळत होती. आता पडद्यावरही ती पुन्हा एकदा आईच्या भूमिकेत दिसते आहे. अभिनेत्री रेवती दिग्दर्शित ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात तिने आईची भूमिका साकारली असून या चित्रपटाचे कथानक सत्य घटनेवर आधारित आहे.
या भूमिकेबद्दल बोलताना काजोल म्हणते, ‘सुजाता ही अतिशय साधी पण खंबीर आणि कणखर आई आहे. ज्या व्यक्ती साध्या असतात त्याच खऱ्या अर्थाने खंबीर आणि धाडसी असतात असे मला वाटते. आणि सुजाता या पात्राचे वैशिष्टय़च हे आहे की तिच्यासमोर आलेल्या प्रत्येक आव्हानांना ती तोंड देते. आपलं मूल आपल्या डोळय़ांसमोरच हे जग सोडून जाणार आहे यापेक्षा वाईट स्वप्न एका आईसाठी काय असू शकतं? तर अशा द्विधा मन:स्थितीतून जाणाऱ्या आईची भूमिका मी साकारली आहे. प्रत्येक कलाकार त्याने साकारलेल्या भूमिकांमधून बऱ्याच गोष्टी आत्मसात करत असतो. सुजाता ही भूमिका साकारताना आपल्याला पालक म्हणून वाटणारी भीती आणि त्या भीतीचे परिणाम आपल्या मुलांवर होऊ द्यायचे नाही, हे या भूमिकेतून शिकल्याचे’, काजोल सांगते.
वर्षांनुवर्ष चित्रपटसृष्टीत काम करत असताना कधीतरी क्षणभर विराम घ्यावा अशी भावना प्रत्येक कलाकाराच्या मनात येतेच, मात्र, स्वत:हून चित्रपटांपासून दूर राहण्याचे धाडस फारच कमी कलाकार करतात. पुन्हा आपल्याला काम मिळेल का? हवी तशी भूमिका साकारता येईल का? तसे झाले नाही तर नक्कीच याचा परिणाम आपल्या आर्थिक चक्रावर होईल हे सगळे प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभे राहतात, परिणामी पडद्यापासून दूर राहण्याचा विचार आपसूक बाजूला पडतो. मात्र, काजोल याला अपवाद आहे. ‘न्यासाचा जन्म झाला त्यावेळी मी स्वत:हून आवडीने अभिनय क्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. कारण मला त्यावेळी माझ्या मुलीला मोठे होताना पाहायचे होते आणि तिच्यासोबत वेळ घालवायचा होता. माझे एक ध्येय होते की ती एक वर्षांची होईपर्यंत मला तिला निरोगीपणाने वाढवायचे होते. त्यानंतर हळूहळू का होईना तिला अनेक गोष्टींची समज येईल, पण वर्षभराची होईपर्यंत ती सर्वस्वी माझी जबाबदारी होती’, असे सांगत या एका कारणासाठी आपण आई म्हणून असलेल्या जबाबदारीला अधिक प्राधान्य दिल्याचे तिने सांगितले. न्यासाला एका ठरावीक चौकटीप्रमाणे वाढवायचे नाही याबद्दलही ती ठाम होती. त्यामुळे न्यासाच्या पहिल्या वाढदिवसालाही तिने मोठय़ा पाटर्य़ा देणे, कार्यक्रम अशा जंगी गोष्टींना फाटा दिला होता. ‘मी न्यासा आणि तिच्या काही मित्र-मंडळींना पोहण्यासाठी घेऊन गेले होते आणि तिथेच त्यांना खाऊ देत तिचा पहिला वाढदिवस साजरा केला’, अशी आठवण काजोलने सांगितली.
‘सलाम वेंकी’ चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शिका म्हणून रेवती यांची असलेली वेगळी ओळख खरे तर या दोन गोष्टी काजोलला चित्रपटाला होकार देण्यासाठी पुरेशा होत्या. याबाबतीत चित्रपटाच्या कथेचे पारडे अधिक जड असल्याचे ती सांगते. ‘या चित्रपटात आजाराने ग्रस्त असलेला तरुण मुलगा काही वर्षांतच हे जग सोडून जाणार आहे आणि त्याच्या आईला जरी हे कटू सत्य माहिती असले तरी ती त्याला लढायला, स्वप्न पाहायला आणि ते जिद्दीने पूर्ण करायला शिकवते. अशा विचित्र परिस्थितीत सापडलेल्या आई आणि मुलाची भावनिकता किती गुंतागुंतीची असेल हे तुमच्या सहज लक्षात येईल. ती खंबीर आई साकारताना चित्रीकरणावेळी अनेक प्रसंगी मी आणि वेंकी अर्थात माझ्या मुलाची भूमिका साकारणारा विशाल आम्ही खरोखरीच रडलो आहोत. चित्रपट हे समाजाचे प्रतिबंब असते आणि आम्ही कलाकार ते प्रतिबंब प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो’, असेही काजोलने सांगितले.
दरम्यान, एकीकडे बॉलीवूडमधील बरेच कलाकार तमिळ, तेलुगू, मराठी अशा अन्य भाषांतील चित्रपटांमध्ये झळकत असताना काजोलनेही मराठी चित्रपटांत काम करावे अशी मागणी तिच्या चाहत्यांकडून केली जात आहे. या मागणीला उत्तर देताना काजोल म्हणते, ‘मी फार विचारपूर्वक चित्रपट स्वीकारते. ज्या चित्रपटाची कथा मला मनापासून भावते तो चित्रपट मला करायला आवडतो. मग त्यावेळी मी कधीच भाषा कोणती आहे हे पाहात नाही. त्यामुळे मराठी चित्रपटाची चांगली कथा आणि भूमिका माझ्या वाटय़ाला आली तर नक्कीच मला करायला आवडेल’.
एकीकडे काजोलला मराठी चित्रपटांत काम करण्याची इच्छा आहे तर दुसरीकडे तिला दिग्दर्शक रोहित शेट्टीबरोबरही आवर्जून काम करायचे आहे असे ती सांगते. सध्या अजय देवगण आणि रोहित शेट्टी ही दिग्दर्शक – कलाकार जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र या दोघांबरोबरच्या चित्रपटासाठी मला कधीही विचारणा झाली नाही, असे ती सांगते. ‘मलाही विनोदी भूमिका दे.. असे मी रोहितला सांगणार आहे. ‘गोलमाल’ चित्रपटात अजयने साकारलेली गोपालची भूमिका मीही करू शकते’, असे सांगणाऱ्या काजोलने याआधी रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘दिलवाले’ या चित्रपटात काम केले आहे. आता खरोखरच काजोल, अजय देवगण आणि रोहित शेट्टी या त्रिकुटाच्या एकत्र विनोदी चित्रपटाचा योग जुळून येतो की नाही हे पाहायचे.