दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन आगामी ‘सालार’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो वर्धराज मन्नार द किंगच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच, त्याच्या वाढदिवशी, निर्मात्यांनी चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले होते ज्यामध्ये त्याच्या व्यक्तिरेखेचा लूक दिसत होता. अभिनेत्याचा हा लूक पाहून चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले. या चित्रपटाचे प्रदर्शन काही दिवसांवर आले असताना पृथ्वीराजचे आणखी एक पोस्टर नुकतेच शेअर केले गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेक्षक सध्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. याबरोबरच ‘सलार’ आणि शाहरुख खानचा ‘डंकी’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने याची अधिक चर्चा होताना दिसत आहे. मध्यंतरी शाहरुख च्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे जाणार असं वृत्त समोर आलं होतं, परंतु आता तसं काहीही न होता हे दोन्ही चित्रपट ठरलेल्या दिवशी प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याविषयी नुकतंच पृथ्वीराज सुकुमारनने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “हा काय चित्रपट…” जेव्हा करण जोहरने काढलेले फरहान अख्तरविषयी ‘असे’ उद्गार

मीडियाशी संवाद साधताना सुकुमारन म्हणाला, “मी हे दोन्ही चित्रपट आवर्जून पाहणार आहे. शाहरुख खानच्या ‘डंकी’साठी मी उत्सुक आहे. सुट्ट्यांच्या दिवसांत बॉक्स ऑफिसवर दोन जबरदस्त चित्रपट प्रदर्शित झाले असल्याचं चित्र बऱ्याच वर्षांनी पाहायला मिळत आहे. भारतीय चित्रपटांचं सेलिब्रेशन याहून उत्तमरित्या होऊच शकत नाही.”

‘सालार’ २२ डिसेंबर २०२३ रोजी हिंदी, कन्नड, तामिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभाससह पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, जगपती बाबू, टिन्नू आनंद आणि ईश्वरी राव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात प्रभासने पहिल्यांदाच दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनाखाली काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj sukumaran reacts on salaar and shahrukh khan dunki clash avn