मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापटचं नाव आवर्जून घेतलं जातं. मराठीसोबतच प्रियाने काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. अनेक चित्रपटांमध्ये झळकलेल्या प्रियाने आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही तिची पहिलीवहिली वेब सीरिज ‘हॉटस्टार’ या अॅपवरून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे आणि चर्चा होण्यामागचं कारणही तसंच आहे. या सीरिजमधील प्रिया बापटचा एक बोल्ड सीन व्हायरल होत आहे.
अभिनेत्री गीतिका त्यागीसोबतचा प्रियाचा बोल्ड सीन असून याबद्दल तिला ट्रोलही केलं जातंय. या दृश्याबद्दल ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना प्रिया म्हणाली, ‘अशा प्रकारच्या ट्रोलिंगला मी आजवर प्रत्युत्तर दिले नाही. कपड्यांवरूनही लोकांनी माझ्यावर खूप टीका केली. हेच कपडे का घातले, इतके छोटे कपडे का घातले, असे प्रश्न अनेकजण विचारतात. पण यावर आपण न बोलून आपलं काम करत राहणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. मी आजपर्यंत तेच केलंय. माझं काम बोलू दे. प्रेक्षकांनी वेब सीरिज पाहिली तर त्या दृश्याचं महत्त्व, ते दृश्य का आहे हे समजेल.’
‘बोल्ड सीनबाबत मला वाटतं की, ते तुमच्या कथेचा भाग आहेत का? तुम्ही कोणती भूमिका साकारता आहात? दिग्दर्शक कोण? लेखक कोण? ते दृश्य कथेची गरज म्हणून करतायत की फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे? तुमच्या त्या दृश्यांनी कथेत खरंच मोठा फरक पडणार आहे का? या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात,’ असंही ती पुढे म्हणाली.
या सीरिजमध्ये प्रिया पूर्णिमा गायकवाड ही भूमिका साकारत आहे. नागेश कुकुनूर दिग्दर्शित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजला राजकारणाची पार्श्वभूमी आहे.