अभिनेत्री प्रिया बापटची पहिलीवहिली वेब सीरिज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि अल्पावधीतच ती चर्चेचा विषय ठरली. ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे सीरिजमधला प्रियाचा बोल्ड किसिंग सीन. पण एखाद्या कलाकाराने प्रत्येक वेळी ‘गर्ल नेक्स्ट डुअर’, सोज्वळ अशाच भूमिका साकारायला पाहिजेत का? जर कलाकाराला त्याच्या कामाच्या अनेक छटा दाखवण्याची संधी मिळत असेल तर त्याने ते का करू नये, असा सवाल प्रियाने केला आहे.

‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना प्रिया म्हणाली, ‘गेल्या पाच-सात वर्षांत मी जे काही वाचलंय, पाहिलंय त्यावरून एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कोणतीच व्यक्ती चूक किंवा बरोबर नसते. पण आपल्याला मात्र कायम लोकांना पांढरं किंवा काळं यातच मोजायचं असतं. समोरचा माणूस चुकू शकतो आणि तो माणूस आहे म्हणूनच चुकतोय हे आपल्याला समजून घ्यायला हवं. एखाद्याने केलेली गोष्ट बघणाऱ्याला जरी चुकीची वाटत असली तरी त्या व्यक्तीला ती बरोबर वाटू शकते. आपला दृष्टीकोन वेगळा असतो आणि त्यानुसार आपण इतरांबद्दल मत तयार करतो. ही संपूर्ण गोष्ट मला या वेब सीरिजच्या बाबतीत महत्त्वाची वाटते. कारण प्रत्येक भूमिका पाहणाऱ्याला चुकीची किंवा बरोबर वाटत असली तरी ते त्या भूमिकेला बरोबर वाटत असते. बघताना कदाचित तुम्हाला ती चूक किंवा बरोबर वाटू शकते. पण त्या जागी तुम्ही असता तर कदाचित तसेच वागले असता. अभिनेत्री म्हणून मला या भूमिकेची फार गरज होती. प्रत्येक वेळी गर्ल नेक्स्ट डुअर, गुडी गुडी, सोज्वळ अशाच भूमिका करत बसायच्या का? एखाद्या कलाकाराला कामाच्या अनेक छटा, पैलू दाखवण्याची संधी मिळत असेल तर त्याने ते का करू नये?’

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजमध्ये प्रिया पूर्णिमा गायकवाड ही भूमिका साकारत आहे. नागेश कुकुनूर दिग्दर्शित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजला राजकारणाची पार्श्वभूमी आहे.

Story img Loader